कोल्हापूर : केंद्र सरकारकडून शेतकरीविरोधी करण्यात आलेले कृषी कायदे स्थागित नको, तर कायमचे रद्द करा, अशी मागणी करत जिल्हा फेरीवाले कृषी समितीने शुक्रवारी शिवाजी चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी ‘स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी झाली पाहिजे’, ‘भांडवलदार धार्जिणे कृषी कायदे रद्द करा’, ‘शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.
माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, गेल्या दीड महिन्यांपासून शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करत असून, त्यांची दखल घेतलेली नाही. दिलीप पवार म्हणाले, कायदे करताना विरोधी सदस्यांच्या कमिटीसमोर हा विषय ठेवला गेला नाही. लोकसभेतही चर्चा न करता कायदे आणले. सरकारची ही हुकूमशाही प्रवृत्ती आहे. देशपातळीवरील सर्व फेरीवाले यामुळेच शुक्रवारी रस्त्यावर आले असून, कोल्हापुरातही या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
माजी नगरसेवक अशोक भंडारे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू, रियाज कागदी, किशोर घाटगे, सुरेश जरग, तयब मोमीन, अंजुम पठाण, नितीन पाटील, आदी उपस्थित होते.
जनतेने रस्त्यावर उतरण्याची वेळ
रघुनाथ कांबळे म्हणाले, एकाही शेतकऱ्याने अशाप्रकारचे कायदे करण्याची मागणी केली नव्हती. हे कायदे स्थगित करण्यामागेही काही मिलीभगत असल्याचा संशय आहे. स्थगिती नको तर काळे कायदे रद्दच करावेत. भविष्यात रेशन व्यवस्थेवर याचा परिणाम होणार असून, नागरिकांनी याविरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.
फोटो : १५०१२०२१ केएमसी फेरीवाले निदर्शने
ओळी : कोल्हापुरात केंद्र शासनाच्या कृषी कायद्यांविरोधात शुक्रवारी फेरीवाले कृती समितीने शिवाजी चौकात निदर्शने केली.