कोल्हापूर : कोरोनामुळे सर्वांसमोरच आर्थिक संकट आहे, अशा वातावरणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपला गणेशोत्सव विधायक कार्यातून साजरा करावा, कोणावरही वर्गणीची सक्ती करू नये, जी वर्गणी मिळते त्याचा योग्य विनियोग करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.
कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव हा दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण असतो. देखाव्यासह जल्लोषात निघणारी आगमन व विसर्जन मिरवणूक यामुळे गणेशोत्सव दिमाखात होतो. दरवर्षी व्यापारी, व्यावसायिक यांच्याबरोबरच घरोघरी वर्गणी मागितली जाते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना आणि महापुराचे संकटामुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात सर्वसामान्यावर वर्गणीची सक्ती करू नका. विशेषतः हातगाडीवाले, खाऊगल्ल्या येथीलही छोट्या व्यावसायिकांना वर्गणीसाठी दमदाटी होऊ नये. अशा प्रकारे सक्तीची वर्गणी गोळा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून पुढे येत आहे.
कोट..
गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वर्गणीसाठी कोणावरही सक्ती करू नये, मंडळाची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे करणे बंधनकारक आहे. ही नोंदणी झाल्यानंतरच नागरिक स्वेच्छेने देणारी रक्कम स्वीकारावी. कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव नियमांचे पालक करावे. - शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर