कसबा बावडा : राजाराम बंधारा पंचगंगा नदीत मगरीचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कसबा बावडा, लाईन बझार व इतर आजूबाजूच्या परिसरातील तरुणांनी रंगपंचमी दिवशी म्हणजेच ( दि.२ एप्रिल ) खेळ खेळल्यानंतर रंग धुण्यासाठी राजाराम बंधारा पंचगंगा नदीत आंघोळीसाठी फिरकू नये, असे आवाहन बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम बंधारा ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कसबा बावडा व लाईन बझार परिसरात परप्रांतीय आणि स्थानिक तरुण मोठ्या प्रमाणात रंगपंचमी सण साजरा करतात. सकाळी नऊ वाजता सुरू झालेला हा खेळ सायंकाळी चारपर्यंत चालतो. त्यानंतर सर्वजण नदीला रंग धुण्यासाठी व आंघोळीला जातात. या दिवशी बंधार्यावर तरूणाईची प्रचंड गर्दी झालेली असते. पण गेले काही दिवस राजाराम बंधारा व परिसरात मगरीचा वावर असून अधून मधून मगरीचे सातत्याने दर्शन होत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बावडा रेस्क्यू फोर्स व राजाराम बंधारा ग्रुपने सावधानतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, बंधाऱ्यावर दुपारनंतर कोणीही आंघोळीसाठी येऊ नये म्हणून राजाराम बंधारा ग्रुपचे कार्यकर्ते याठिकाणी पहारा देणार आहेत, अशी माहिती ग्रुपचे सदस्य तानाजी चव्हाण यांनी दिली.