एकनाथ पाटील -- कोल्हापूर --डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी पोलिस प्रयत्न करतात. त्याला काही प्रमाणात यश आले असले, तरी काही अतिउत्साही तरुण मंडळे मिरवणुकीत डॉल्बी लावून जल्लोष करतात. पोलिस दरवर्षी गुन्हे दाखल करतात. अशा शहरातील ७५ तरुण मंडळांच्या २२५ कार्यकर्त्यांवर डॉल्बीचे गुन्हे दाखल आहेत. कारवाई मात्र शून्य. त्यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांत पोलिसी कारवाईची भीतीच उरलेली नाही. यंदाही पोलिसांनी गणेशोत्सवात डॉल्बीवर निर्बंध घातले आहेत. त्यासाठी कागदोपत्री कारवाई कठोर करण्याचे धोरण अवलंबले आहे. डॉल्बी लावण्याचा आतताईपणा केल्यास कार्यकर्त्यांची थेट न्यायालयीन प्रक्रियेनुसार कारागृहात रवानगी केली जाणार आहे. डॉल्बीच्या ठेक्याचे विपरीत परिणाम समाजात घडले आहेत. २००९ मध्ये गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीच्या ठेक्यात मद्यधुंद अवस्थेत तरुणाई थिरकत असतानाच शिवाजी पेठेतील फिरंगाई व वेताळमाळ तालीम यांच्यात उडालेल्या धुमश्चक्रीत साईराज जगताप या तरुणाचा बळी गेला. दरवर्षी डॉल्बीमुळे मिरवणुका पुढे घेण्यावरून अनेक वादावादीचे प्रसंग घडल्याने मिरवणुका रेंगाळतात. १२ तासांच्या मिरवणुका २४ तासांवर जातात. तरुणांच्या अतिउत्साहापुढे पोलिस यंत्रणाही हतबल होते. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने २०११ मध्ये गणेश उत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पावले उचलली. शहरातील प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक बैठका घेत त्यांच्यात प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. कायद्याच्या पलीकडे जाऊन ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर केल्यास मानवी शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात, हे वैद्यकीयदृष्ट्या पटवून दिले. पोलिसांच्या या प्रयत्नांना काही मंडळांनी सहकार्य केले. सुरुवातीला डॉल्बी लावणार नाही, अशी लेखी हमी देणारेच ऐनवेळी डॉल्बी लावून पुढे असतात. गेल्या चार-पाच वर्षांत सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता डॉल्बीनेच झाली आहे. गतवर्षी शहरातील ७५ तरुण मंडळांच्या २२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याने भागातील ६५ कार्यकर्त्यांवर डॉल्बीचे गुन्हे दाखल करून त्यांना वडगाव न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने या सर्वांची जामिनावर मुक्तता न करता कारागृहात रवानगी केली. या कारवाईने तरुण मंडळांचे कार्यकर्ते, डॉल्बीमालक, ट्रॅक्टरचालक हादरून गेले. जिल्ह्यातील पहिलीच डॉल्बीवर झालेली मोठी कारवाई होती. त्यापाठोपाठ करवीर पोलिसांनी डॉल्बी लावणाऱ्या २२ कार्यकर्त्यांना नोटीस देऊन न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. या दोन्ही पोलिस ठाण्याच्या कारवाई कठोर झाल्या. याच कारवाईचा आधार घेत शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी शहरातील तरुण मंडळांना आतापासून सावध करण्यासाठी बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. डॉल्बी लावल्यास थेट कारागृहात रवानगी करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा कार्यकर्त्यांना दिला आहे. यावर्षी शहरात खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारीच्या वाढत्या घटनांमुळे येथील परिस्थिती वेगळ्या वळणावर आहे. गणेश उत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कार्यकर्त्यांतील संघर्ष गणेश उत्सव काळात उफाळून येतात. प्रत्येकजण याच क्षणाची वाट पाहत असतात. गुन्हे दाखल होऊनही तरुण मंडळे डॉल्बीसाठी पुढे सरसावत असल्याने त्यांना वेळीच चाप लावावा, सुरुवातीपासून त्यांना सूचना मिळाव्यात, यासाठी पोलिस दलाने आतापासूनच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तरुण मंडळे, तालीम संस्थांनी सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. यंदा मात्र डॉल्बी लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून न्यायालयीन प्रक्रियेनुसार कारागृहात रवानगी केली जाईल. - भारतकुमार राणे, पोलिस उपअधीक्षक
डॉल्बी लावल्यास जेल!
By admin | Updated: July 10, 2016 01:48 IST