कोल्हापूर : ‘वाचवणाऱ्यांना वाचवा आणि डॉक्टर्स, सहकर्मचारी आणि हॉस्पिटलवरील हल्ले थांबवा’ अशी मागणी करत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेने शुक्रवारी निषेध दिन पाळला.
या निषेध दिनाच्या निमित्ताने डॉक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले. अनेकांनी काळे पोशाख परिधान केले होते. फना, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), होमिओपॅथी
असोसिएशन(निहा), आयुर्वेद व्यासपीठ संघटना आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए) यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले. छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना या निषेध दिनाबाबत माहिती दिली.
डॉ. आशा जाधव म्हणाल्या, रुग्ण आणि डॉक्टर हे नाते निकोप असले पाहिजे. यात कुठल्याही दुष्ट प्रवृत्तींनी प्रवेश करता कामा नये. अन्यथा समाजाचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. उपाध्यक्षा डॉ. गीता पिल्लई म्हणाल्या, प्रत्येक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी फक्त आपल्याच रुग्णाकडे लक्ष द्यावे असे रुग्णांचे नातेवाईक यांना वाटत असते पण डॉक्टरांचे एकावेळी अनेक रुग्णांवर उपचार चालू असतात. हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.
डॉ. उद्धव पाटील म्हणाले, असेच हल्ले जर चालू राहिले तर वैद्यकीय क्षेत्रावर याचा खूप अनिष्ट परिणाम होईल. डॉ. अशोक जाधव म्हणाले, सरकारने याबाबतचे कायदे अजून कडक केले पाहिजेत. आज स्वतःवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात डॉक्टर रस्त्यावर उतरले पण हे वेळीच थांबले नाही तर सर्व वैद्यकीय अत्यावश्यक सेवादेखील आम्ही बंद करू आणि इथून पुढे कोणत्याही प्रकारचा अन्याय आम्ही सहन करणार नाही.
यावेळी केएमएच्या सचिव डॉ. किरण दोशी, खजनिस डॉ. ए. बी. पाटील, सल्लागार समिती सदस्य डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. संजय घोटणे, डॉ. शीतल पाटील, डॉ. उषा निंबाळकर, डॉ. महादेव जोगदंडे, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. अश्विनी पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
१८०६२०२१ कोल मेडिकल असोसिएशन ०१
डॉक्टरांवरील हल्ल्यांना रोखण्याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव आणि उपाध्यक्षा डॉ. गीता पिल्लई यांनी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांना निवेदन दिले.