सातारा : ‘ज्या राजांनी मोघलांशी हातमिळवणी केली, त्यांच्या किल्ल्यांचे संवर्धन होते. मग शिवरायांच्या किल्ल्यांची अशी अवहेलना का? दुर्ग संवर्धनासाठी मी वाट्टेल ते करायची तयारी ठेवली आहे. नव्या सरकारने किमान समितीची स्थापना तरी केली. भले आजवर त्या समितीवर एक रुपयाही खर्च केला नाही. सध्या आमची ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका आहे. संवर्धनाबाबत योग्य पावले उचलली नाहीत तर मावळ्यांच्या साथीने कठोर पावले उचलण्याशिवाय पर्याय नाही,’ असा इशारा युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. सरसेनापती हंबीरराव बाजी मोहितेंच्या भूमीत किल्ले वसंतगडावर महाराष्ट्राच्या तिसऱ्या दुर्ग संमेलनाची सुरुवात झाली. सरसेनापतींच्या समाधीसमोर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व संभाजीराजे छत्रपती यांनी मशाल प्रज्ज्वलित करून उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष पांडुरंग बलकवडे, निमंत्रक दीपक प्रभावळकर, शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, प्रा. के. एन. देसाई, डॉ. संदीप महिंद यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. वसंतगड अनेक मोठ्या व ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे, हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देईल, त्यामुळेच राज्यसरकारकडे पाठपुरावा करून वसंतगडसाठी पन्नास लाखांचा निधी देणार असल्याची घोषण शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी केली. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. वसंतगडावर राज्यभरातील मावळ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. (प्रतिनिधी) दोन छत्रपती एकत्र साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि आणि कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती या दोन्ही गाद्यांचे प्रतिनिधी एकत्र येणार असल्यामुळे अनेकांमध्ये उत्सुकता होती. मावळे तर हा प्रसंग याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आतुर होते. दोघेही एकत्र आले, एकमेकांचा मानपान केला आणि सर्वजण धन्य-धन्य झाले. दुर्ग संमलनामुळेच दोन्हीही छत्रपती एकत्र आले, असे संभाजीराजे म्हणताच उपस्थितांनी त्यांना जयघोषात प्रतिसाद दिला. कार्याध्यक्ष शंभूराज यांना टोला तिसऱ्या दुर्ग संमेलनाचे आमदार शंभूराज देसाई कार्याध्यक्ष आहेत. परंतु ते स्वत: किल्ल्यावर आले नाहीत, त्यामुळे अनेक वक्त्यांनी त्यावर टोलेबाजी केली. संभाजीराजेंनी तर राज्यातील सर्वच आमदारांना रायगडाची पायी ट्रीप घडावावी किंवा मंत्रिमंडळाची एखादी बैठक रायगडावर घ्यावी, त्याशिवाय त्यांच्या डोक्यात शिवरायांचे विचार शिरणार नाहीत, असा घणाघात केला.
किल्ल्यांची अवहेलना नको...
By admin | Updated: November 22, 2015 00:01 IST