कोल्हापूर : कोणत्याही आमिषाला भुलून मतदारांनी आपले मत विकू नये. शिवाय यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदार प्रबोधनाचा उपक्रम कोल्हापूर कॉलिंग, क्रिडाई कोल्हापूर, असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्स आणि व्यापारी महासंघातर्फे राबविण्यात येत आहे, अशी माहिती ‘कोल्हापूर कॉलिंग’चे संकल्पक पारस ओसवाल व क्रिडाई कोल्हापूरचे सचिव विद्यानंद बेडेकर यांनी दिली.ओसवाल म्हणाले, हद्दवाढ, ढपला व भ्रष्टाचारमुक्त सभागृह, थेट पाईपलाईन योजना, विमानतळ विस्तारीकरण, विमानसेवा, महापालिका शाळांतून दर्जेदार शिक्षण, अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा, टोलमुक्त शहर, आदी मुद्द्यांवर शहरातील विविध क्षेत्रातील लोक कोल्हापूर कॉलिंगच्या माध्यमातून कार्यरत आहेत. शहराचा रचनात्मक विकास होण्यासाठी तांत्रिक ज्ञान असलेले नगरसेवक महापालिकेत निवडून जाणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य पद्धतीने मतदान होणे गरजेचे आहे. शिवाय मतदानाचा टक्कादेखील वाढणे आवश्यक आहे. ते लक्षात घेऊन मतदार प्रबोधनाचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. याअंतर्गत मतदानाचे महत्त्व पटवून देणाऱ्या २५ हजार पत्रकांचे शहरातील घरोघरी वाटप केले आहे. त्यासह प्रबोधनाचे रथ असलेले दोन टेम्पो फिरत आहेत. कोणत्याही आमिषाला भुलून जाऊन शहरवासीयांनी आपले मत न विकता योग्य उमेदवाराला खऱ्या अर्थाने ‘मत’दान करावे, असे आवाहन त्यांनी केले.बेडेकर म्हणाले, पत्रकांसह व्हॉटस्-अॅप, फेसबुक अशा सोशल मीडियांद्वारे प्रबोधन केले जात आहे. विविध व्यवसायांत कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पक्षांनी मांडलेल्या जाहीरनाम्यांतून काही मुद्दे घेऊन आम्ही एकत्रित जाहीरनामा बनविला असून तो विजयी उमेदवारांसमोर मांडण्यात येईल. यावेळी आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगांवकर, क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सुजय होसमणी, चार्टर्ड अकौंटंट महेश धर्माधिकारी, हॉटेल मालक-चालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, आदी उपस्थित होते. विजयी उमेदवारांचा ८ नोव्हेंबरला सत्कारसर्व विजयी उमेदवारांचा कोल्हापूर कॉलिंगतर्फे ८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाचला धैर्यप्रसाद हॉलमध्ये सत्कार करुन त्यांच्यासमोर शहर विकासाचा एकत्रित अजेंडा मांडण्यात येईल, असे पारस ओसवाल यांनी सांगितले.
आमिषाला भुलू नका, ‘मत’दानच करा
By admin | Updated: October 31, 2015 00:27 IST