सत्ताधारी जनसुराज्य गावविकास पॅनेलचे नेतृत्व माजी सरपंच शिवाजी पाटील व जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे करत आहेत. तर विरोधी ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व दिलीप भोसले करत आहेत, तर भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व सुनील पाटील करत आहेत. या ग्रामपंचायतीत एकूण ११ सदस्य असून, ३,३८६ मतदार आहेत.
गतवेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे व विद्यमान सरपंच शिवाजी पाटील यांच्या गटात सरळ लढत झाली होती. २०२१मध्ये निवडणूक उमेदवारीवरून व नेतृत्वावरून शिवाजी पाटील गटामध्ये फूट पडल्याने एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे दोन्ही शिवाजी एकत्र आल्याने विरोधी दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढत होणार का? दोन्ही शिवाजी बाजी मारणार का, याकडे परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सध्या सरपंच आरक्षण जाहीर नसल्याने प्रत्येक प्रभागात सर्वच प्रवर्गाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी गट प्रमुखांसमोर आवाहन उभे राहिले असून, प्रभाग क्रमांक १ मध्ये तीन जागांसाठी ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने याठिकाणी तिरंगी लढत होत आहे. तर प्रभाग क्रमांक २ व ३ मध्ये दुरंगी लढत होत आहे. तर प्रभाग चारमध्ये दुरंगी बरोबरच एक अपक्ष उमेदवार असल्याने निवडणुकीमध्ये कोण, कुठे बाजी मारणार, याची चर्चा होत आहे.