ओरोस : मुलाला तपासण्यासाठी उशीर केल्याच्या रागातून जिल्हा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय श्रीपाद ढवळे यांच्यासह त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी जगदीश सुभाष चव्हाण (रा. तळगांव) यांच्यावर ओरोस पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. आज, शुक्रवारी सायं. ४.१५ च्या सुमारास ही घटना शासकीय निवासस्थानात घडली. सीसीटीव्ही फुटेजवरून मारहाण करणाऱ्याची ओळख पटली.मुलाला तपासण्यासाठी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एकजण शासकीय रुग्णालयात आला होता. त्याच्यासोबत एक महिला व दोन पुरुष होते. वॉर्डबॉयने डॉ. विजय ढवळे आताच ओपीडी संपवून निवासस्थानात गेल्याचे त्यांना सांगितले. मुलाच्या पालकांनी काही वेळ वाट पाहून डॉ. ढवळे यांचे निवासस्थान गाठले. तेवढ्यात बाहेर पडत असलेल्या डॉ. ढवळे यांच्या थोबाडीत मारून त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच तेथे असलेल्या डॉ. ढवळे यांचे वडील श्रीपाद ढवळे यांनाही मारहाण केली आणि ते पळून गेले. या घटनेनंतर ओरोस पोलीस रुग्णालयात आले. सीसीटीव्ही फुटेजवरून मारहाण करणारी व्यक्ती जगदीश चव्हाण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा नोंद करून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ‘मॅग्मो’कडून निषेध ‘मॅग्मो’कडून निषेध ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी विजय ढवळे यांना झालेल्या मारहाणीचा सिंधुदुर्ग मॅग्मो संघटनेतर्फे निषेध करण्यात आला आहे.शनिवारी मॅग्मो संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत मारहाण करणाऱ्यास पकडण्याबाबत निवेदन सादर करणार आहेत. तसेच मारहाण करणाऱ्यास चोवीस तासाच्या आत न पकडल्यास कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही मॅग्मोचे सरचिटणीस डॉ. बी. एन. पितळे यांनी दिला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरना मारहाण
By admin | Updated: November 15, 2014 00:04 IST