कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या गगनबावडा तालुका प्रतिनिधींच्या ठरावाबाबत काँग्रेसचे मानसिंग पाटील यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पी. जी. शिंदे यांचा बॅँकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. वादग्रस्त २३ मतांची लवकरच मोजणी प्रक्रिया राबवून निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गगनबावडा तालुका विकास संस्था गटात ६६ मतदार होते. यापैकी १८ संस्था जिल्हा बँकेच्या थकबाकीदार असल्याने त्यांना मतदान करता येणार नसल्याची हरकत घेत याबाबत मानसिंग पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच मुद्द्यावर शिंदे यांनी पाटील यांच्या पाच संस्थांबाबत याचिका दाखल केली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच यावर सुनावणी होऊन या २३ संस्थांचे मतदान स्वतंत्र घ्यावे व त्याची मतमोजणी करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर उर्वरित ४३ संस्थांच्या मतदानाची मोजणी करावी; पण त्याचा निकाल जाहीर करू नये, असेही आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार या गटातील ४३ मतांची मोजणी करण्यात आली, यामध्ये पाटील यांना २५, तर पी. जी. शिंदे यांना १८ मते मिळाली. त्यामुळे २३ ठरावांबाबत न्यायालय काय निकाल देते, याबाबत उत्सुकता लागली होती. यावर ७ जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होऊन पाटील यांची याचिका फेटाळून लावली. पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली. त्याला उच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन पाटील यांची याचिका फेटाळून लावल्याचे समजते. त्यामुळे शिंदे यांचा जिल्हा बॅँकेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार २३ मतांची मोजणी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. ४३ मतांमध्ये सात मतांनी शिंदे मागे असले तरी २३ मतांची मोजणी झाल्यानंतर ते सहा मतांनी विजयी होऊ शकतात. पी. जी. शिंदे यांच्याकडून अॅड. शिवाजी जाधव यांनी काम पाहिले. काही मंडळींनी गगनबावडा तालुक्यात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. विरोधकांनी अनेक आमिषे दाखवून मला थोपविण्यासाठी केलेले प्रयत्न जनतेने धुडकावून लावलेच; शिवाय न्यायदेवतेनेही सत्याच्या बाजूने न्याय दिला. - पी. जी. शिंदेसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत अद्याप मला मिळालेली नाही. निकाल पाहून पुढील कार्यवाही केली जाईल. मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचा आदेश असल्यास ती प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. - डॉ. महेश कदम (निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा बॅँक)
जिल्हा बँकेतील ‘पी. जी.’चा मार्ग मोकळा
By admin | Updated: July 28, 2015 01:22 IST