शिरोळ : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून निधी कमी पडणार नाही. या योजनेसाठी ज्या जाचक अटी आहेत, त्या शिथिल करण्यासाठी शासन स्तरावर माझा पाठपुरावा सुरू आहे. वंचित लाभार्थ्यांना निश्चितच न्याय मिळेल, असा आशावाद आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला.
येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्यावतीने मंजूर लाभार्थ्यांना पत्र वितरणाचा कार्यक्रम पार पडला. मंत्री डॉ. यड्रावकर म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर बैठक घेऊन संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी वंचित होते त्यासाठी प्रथम आम्ही तालुक्यात समिती गठीत केली. समितीच्या पहिल्याच बैठकीत ५८४ प्रकरणे मंजूर करून उच्चांक केला. तालुक्यामध्ये एकही निराधार लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, याची शासन काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, नायब तहसीलदार संजय काटकर, रमेश शिंदे, सुजाता पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
फोटो -१३०२२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ येथे संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर पत्रे डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, नायब तहसीलदार संजय काटकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.