कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या अनुषंगाने काळम्मावाडी धरण परिसरात उभारण्यात येणाऱ्या जॅकवेल, पंप हाऊस, विद्युत सबस्टेशनच्या कामास राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाने बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेत काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्यातील मुख्य अडथळे आता दूर झाले. ही सर्व कामे २०१६ च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न आहे.योजनेच्या कामातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जॅकवेल, पंप हाऊस, विद्युत सबस्टेशन उभारण्याच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. गेल्या दहा महिन्यांपासून या कामास मान्यता मिळावी म्हणून महानगरपालिका प्रशासन प्रयत्न करीत होते. मान्यतेसंबंधीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने जानेवारी महिन्यात वन्यजीव महामंडळाकडे पाठविला होता. तत्पूर्वी राज्य सरकारच्या विविध विभागांच्या मान्यता घेऊन हा प्रस्ताव नागपूर येथील वन्यजीव विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्याकडून कामाची छाननी झाली होती. दोन दिवसांपूर्वी मनपाचे मुख्य जलअभियंता मनीष पवार व शाखा अभियंता अजय साळुंखे नागपूरला गेले होते तेथून प्रस्ताव घेऊन दिल्लीला गेले. बुधवारी दुपारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकरही उपस्थित होते. या बैठकीत महानगरपालिकेचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम अडीच वर्षांत पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यातील एक वर्ष मान्यता मिळविण्यातच गेली. केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे या मान्यता मिळवून देण्याच्या कामात थोडे राजकीय पातळीवर दुर्लक्ष झाले होते. मात्र, मनपा प्रशासनाने त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता.आता फक्त दोन परवानग्या प्रलंबित आता केवळ दोन परवानगी मिळणे बाकी आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ३.५० किलोमीटर्स अंतरातील रस्त्याच्या बाजूने तर पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या ११ किलोमीटर्स अंतरातील रस्त्याच्या बाजूने पाईप घालण्यात येणार असून, त्याची मान्यता मिळणे बाकी राहिले आहे; परंतु ही मान्यता मिळविण्याचा विषय हा राज्य सरकारशी संबंधित असल्याने तीही मान्यता लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील वन्यजीव महामंडळाने मान्यता दिल्याने पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्य जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचीही एक परवानगी आठ दिवसांपूर्वीच मिळाली आहे. बांधकाम विभागाच्या मालकीच्या २९ किलोमीटर्स इतक्या रस्त्याच्या बाजूने पाईप घालण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मान्यतेचा प्रस्तावही प्रलंबित होता. आक्षेपाविना ‘वन्यजीव’ची मंजुरीकाळम्मावाडी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या राजापूर गावाजवळ जॅकवेल, पंप हाऊस आणि विद्युत सबस्टेशन उभारायचे आहे. तेथून धरण क्षेत्रात २०० मीटर अंतर आतमध्ये पाईपलाईन टाकून जॅकवेलमध्ये पाणी घ्यायचे आहे. या कामासाठी १.३१ हेक्टर जागा संपादन करावी लागणार आहे. ही जागा वन्यजीव विभागाची आहे. त्यासाठी ही मान्यता लागणार होती. महापालिकेने दिलेल्या प्रस्तावावर कोणताही आक्षेप न घेता वन्यजीव महामंडळाने त्यास मान्यता दिली.
‘थेट पाईपलाईन’चे अडथळे अखेर दूर
By admin | Updated: November 5, 2015 01:05 IST