स्वतःसाठीच एखाद्या घराचे किंवा जागेचे इंटेरिअर करायचे आहे, असे समजूनच मी प्रत्येक प्रकल्पावर काम करते. त्यामुळे कमी वेळेत या क्षेत्रात मला चांगली कामगिरी करता आली आहे.
-शांभवी दीक्षित-कुलकर्णी
संतोष मिठारी, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : येथील इंटेरिअर डिझाईनर शांभवी प्रांजल दीक्षित-कुलकर्णी यांना बंगलोरमधील ‘बिगीन अप रिसर्च इंटेलिजन्स’ या संस्थेने या वर्षीच्या ‘ नॅशनल आर्किटेक्चर ॲण्ड इंटेरिअर डिझाइन अवॉर्ड’ने सन्मानित केले आहे. निवासी व व्यापारी संकुल या विभागातील या पुरस्कारासाठी त्यांची देशभरातील १० हजार आर्किटेक्ट आणि इंटेरिअरमधून निवड झाली. त्याबद्दल या क्षेत्रातील त्यांची कामगिरी, जगभरातील नवे ट्रेंड, रोजगार-व्यवसायाच्या संधी, आदींबाबत त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.
प्रश्न : इंटेरिअर डिझाइनिंग क्षेत्रातील तुमच्या कामगिरीबाबत काय सांगाल?
उत्तर : माझे माहेर होसूर (तमिळनाडू), तर कोल्हापूर हे सासर आहे. डिग्रीच्या शेवटच्या वर्षी म्हणजेच वयाच्या २० व्या वर्षापासूनच मी इंटेरिअरचे प्रकल्प करायला सुरुवात केली. अगदी छोटे प्रकल्प ते लक्झुरिअस प्रकल्पांचे काम केले आहे. माझ्यासाठी प्रत्येक प्रकल्प हा तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रकल्पाची गुणवत्ता जपत कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सुविधा देणे हा माझा उद्देश असतो. त्यामुळे करिअरची सुरुवात केल्यापासून गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये मी शंभरहून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. विविध इंटेरिअर महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे काम करते. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा घेते.
प्रश्न : ‘इंटेरिअर’मध्ये जगभरात नवे ट्रेंड काय आहेत?
उत्तर : सध्या मिनिमिलिझम म्हणजेच कमीत कमी वस्तू, रंगसंगती, साधने यांचा वापर करून मानसिक आणि शारीरिक सुविधांमध्ये सुधारणा करण्याचा जगभरात ट्रेंड आहे. जेणेकरून एकाच जागी राहून काम करताना सहजता येऊ शकेल. एखाद्या मटेरिअलची मूळ ओळख जपण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याबाबतचे उदाहरण द्यायचे असेल, तर आम्ही एक्स्पोझ ब्रिक, लाकूड, बांबू, कापड यांचा जास्तीत जास्त वापर करतो. त्याच बरोबर कमीत कमी ऊर्जा आणि नैसर्गिक साधनसंपतीचा वापर व्हावा याचाही विचार डिझाईन करताना केला जातो. ग्राहकांना घराची स्वच्छता, देखभाल, नीटनेटकेपणा हा जास्तीत जास्त कसा टिकवता येईल याचाही विचार डिझाईन करताना होत आहे. देखभालरहित डिझाईन्सना वाढती मागणी आहे.
प्रश्न : या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना करिअरबाबत काय सांगाल ?
उत्तर: विद्यार्थ्यांना सांगायचे झाल्यास योग्य शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यांनी वेळेचा पूर्ण सदुपयोग करावा. आपल्या क्षेत्रातील विविध सॉफ्टवेअरचे (संगणक प्रणाली) ज्ञान मिळवावे. कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. त्याच्या जोडीला बाजारपेठेत नवीन काय आहे, त्याचा अभ्यास करायला हवा; कारण इंटेरिअर डिझाईन क्षेत्रात रोज नवनवीन मटेरिअल, वस्तू, तंत्रज्ञान यांची भर पडत असते. सर्जनशील सादरीकरणाकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना नवनवीन थीम , संकल्पनांचा विचार करावा लागेल, तरच आजच्या स्पर्धात्मक जगात त्यांना आपले करिअर भक्कमपणे करता येईल.
चौकट
रोजगार, व्यवसायांच्या विविध संधी
इंटेरिअर डिझाईन ह्या क्षेत्राची व्याप्ती तशी जास्त आहे. नवीन पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुढे रोजगार, व्यवसायांसाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. थ्रीडी व्हिज्युअलायझर, एक्झिबिशन डिझाईनर, किचन डिझाईनर, फर्निचर डिझाईनर, बाथरूम डिझाईनर, सेट डिझाईनर जेथे विविध चित्रपट, मालिकांचे सेट उभे करणे, त्याचबरोबर इंटेरिअर स्केप म्हणजेच घराच्या आतमधील झाडे, फुले यांचे योग्य ते डिझाईन करून देखभाल करणे, visual merchandisers म्हणून कॉर्पोरेट कार्यालयासाठी थीम बेस डिझाईनवर काम करण्यासाठी संधी उपलब्ध असल्याचे शांभवी यांनी सांगितले.
चौकट
जागरूक कोल्हापूरकर
कोल्हापूरकर हे इंटेरिअर डिझाईनबाबत जागरूक आहे. विविध प्रकारच्या डिझाईन कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात. मग तो जुना वाडा असो किंवा नवा फ्लॅट. येत्या काळात कोल्हापूर हे इंटेरिअर डिझाईनसाठी नवीन संधी निश्चितपणे उपलब्ध करून देईल, असे शांभवी यांनी सांगितले.
फोटो (०४१२२०२०-कोल-शांभवी दीक्षित कुलकर्णी (मुलाखत)