कोल्हापूर : सरकारकडून निधी देऊनही अनेक प्रकल्प रखडतात; पण दिगंबर जैन समाजाच्या दातृत्वातून उभारलेली नूतन इमारत पाहून समाधान वाटते. या समाजाचे दातृत्व आदर्शवत ठरणारे आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे केले. येथील दक्षिण भारत जैन सभेच्या दिगंबर जैन बोर्डिंगच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार महाडिक व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते इमारत व त्यातील विविध दालनांचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील होते. खासदार महाडिक म्हणाले, जैन बोर्डिंगने स्थापनेची १०८ वर्षे पूर्ण केली आहेत. बोर्डिंग हे कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. सरकारी निधी न घेता समाजाच्या दातृत्वातून उभारलेली अद्ययावत इमारत पाहून अभिमान वाटतो. दिगंबर जैन समाजाने या इमारत उभारण्याच्या उपक्रमातून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. बोर्डिंगच्या रस्त्याचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडविला जाईल. आमदार क्षीरसागर म्हणाले, देश घडविण्याचे सामर्थ्य युवकांमध्ये आहे. अशा युवकांना शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम बोर्डिंग करत आहे. सरकारची मदत न घेता जैन समाजाने इमारत उभारण्याची केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. बोर्डिंगमधील व्यायामशाळेसाठी आवश्यक ते साहित्य मी देईन. अध्यक्ष पाटील म्हणाले, दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य काम शिक्षण, आरोग्य आणि संस्कार आहे. कोल्हापूरप्रमाणे जयसिंगपूर, इचलकरंजी आणि सांगली येथे अद्ययावत इमारतींची उभारणी व्हावी. समाजातील गरीब व हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण पैशांअभावी थांबू नये म्हणून समाजाने शिष्यवृत्तीचा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. या उपक्रमासाठी समाजाने आणखीन मदतीचा हात द्यावा. कार्यक्रमात सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष प्रा. डी. ए. पाटील यांनी बोर्डिंग व जैन सभेचा इतिहास व कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक राजू लाटकर, किरण शिराळे, अपर्णा आडके, दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष रावसाहेब जि. पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, सहखजिनदार अॅड. ए. ए. नेमण्णावर, बोर्डिंगचे उपाध्यक्ष सुकुमार पाटील, सहसचिव सूर्यकांत पाटील, प्रफुल्ल चकमले, माधव उपाध्ये, सत्यजित पाटील, महावीर पाटील, राकेश निल्ले, आर. जे. पाटील, विलास बोगार, श्रीपाल जर्दे, कलगोंड पाटील, नितीन पाटील, आदी उपस्थित होते. बोर्डिंगचे सचिव सुरेश रोटे यांनी स्वागत केले. खजिनदार संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार चौगुले व पार्श्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. श्रेणिक पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दिगंबर जैन समाजाचे दातृत्व आदर्शवत
By admin | Updated: May 11, 2015 01:06 IST