गडहिंग्लज :
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यांकडून सेवानिवृत्त ३०० कामगारांचे फायनल पेमेंट व ग्रॅच्युईटी थकीत असतानाही अध्यक्षांनी केवळ ३२ कामगारांची ४८ लाखाची ग्रॅच्युईटी देण्याची घोषणा केली. त्यासाठी ते आंदोलनाची वाट पहात होते काय ? असा सवाल सेवानिवृत्त कामगारांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
थकीत फायनल पेमेंट व ग्रॅच्युईटीसाठी कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचे येथील प्रांतकचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान अध्यक्ष अॅड. श्रीतपराव शिंदे यांनी ब्रिस्क कंपनीकडे कारखाना चालवायला देण्यापूर्वी निवृत्त झालेल्या ३२ कामगारांची ग्रॅच्युईटी चार दिवसांत देण्याची घोषणा बुधवार (दि. २८) पत्रकार परिषदेत केली. त्यासंदर्भात कामगारांनी आपली प्रतिक्रिया पत्रकारासमोर नोंदविली.
यावेळी सेवानिवृत्त कामगार संघटनेचे प्रमुख चंद्रकांत बंदी यांनी कामगारांच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाचे वाचन केले. आंदोलनात कुणा-कुणाचे संगनमत आहे याचा खुलासा शिंदेंनी करावा, अशी मागणीही केली.
कारखाना व्यवस्थापन व ब्रिस्क कंपनी यांच्या संमतीने शासनाने साखर आयुक्तांची लवाद म्हणून नेमणूक केली आहे. मग, कामगारांच्या देणीसंदर्भात ५ वर्षात प्रस्ताव का पाठविला नाही. 'ब्रिस्क'कडून थकीत कारखान्याच्या दैनंदिन खर्चाची आठवण अध्यक्षांना आताच का झाली? असा सवालही करण्यात आला आहे.
यावेळी सुभाष पाटील, बाळासाहेब मोहिते, लक्ष्मण देवार्डे, रणजित देसाई, महादेव मांगले यांच्यासह कामगार उपस्थित होते.
--------
* अन्यथा मुश्रीफ यांच्या दारात बसू
याप्रश्नी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचीही भेट घेणार आहोत. त्यांच्याकडूनच न्यायाची अपेक्षा आहे. कामगारांची थकीत देणी व्याजासह देण्यास संबंधितांना त्यांनी भाग पाडावे, अन्यथा यापुढे आम्ही त्यांच्या दारात बसू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.