कोल्हापूर : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कोअर बँकिंग झाल्या आहेत, त्यामुळे विकास संस्थाही संगणकीकरणाच्या पातळीवर सक्षम व्हाव्यात, असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यासाठी राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
बँकिंग स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा बँकेने इतर बँकांच्या तुलनेत आपल्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी काेअर बँकिंग, मोबाइल बँकिंग आदी सुविधा सुरू केल्या आहेत. मात्र, विकास संस्थांच्या पातळीवर याबाबत फारशी जागृती दिसत नाही. विकास संस्था, जिल्हा बँक व सहकार विभाग यांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठित केली आहे. ही समिती दोन महिन्यांत विकास संस्था संगणकीकरणासाठी काय करावे याबाबत अहवाल सादर करणार आहे. समितीमध्ये राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख, पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह सांगली व सातारा जिल्हा बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावतीचे जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, संगमनेरचे उपनिबंधक गणेश पुरी, साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्यासह आयुक्त कार्यालयातील उपनिबंधक (कृषीपत) व उपनिबंधक (भूविकास) यांची नेमणूक करण्यात आली आहे.