राम मगदूम - गडहिंग्लज -- १९४५ पासून नगरपालिकेच्या वहिवाटीत असलेल्या येथील श्री मारूती मंदिरापैकी सार्वजनिक सरकारी धर्मशाळा इमारतीला देखील ५ वर्षापूर्वीच भूमीअभिलेख खात्याने पांडुरंग आणि मारूती देवस्थान ट्रस्टचे नाव परस्पर लावले आहे. ही मिळकत इमारतीसह ताब्यात मिळावी अशी मागणी ट्रस्टने पालिकेकडे केली आहे. यासंदर्भातील निर्णय उद्या (गुरूवारी) पालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. शहरातील नेहरू चौकात मारूती मंदिर आहे. त्याच्या पूर्वेस पिंपळाचा पार आणि पश्चिमेस कौलारू इमारत आहे. मंदिर वगळता दोनही मिळकतीच्या उताऱ्यावर सुमारे ७० वर्षापासून वहिवाटदार म्हणून ‘म्युनिसीपालिटीचे’ नाव आहे.२०१० मध्ये धर्मादाय आयुक्तांचा आदेश, ट्रस्टचा पी.टी.आर. उतारा व प्रा. विठ्ठल बन्ने यांच्या शपथपत्रानुसार भूमिअभिलेख खात्याने या मिळकतीच्या उताऱ्यावरील म्युनिसीपल्टीचे नाव कमी करून ट्रस्टचे नाव लावले आहे.‘त्या’ दाव्यातील आदेश प्रतिवादी दयानंद आप्पाजी केसरकर यांचेपुरता मर्यादित असून त्यात मूळ वहिवाटदार नगरपालिका प्रतिवादी नसल्याने धर्मादाय आयुक्तांचा आदेश पालिकेस लागू होत नाही.नगरपालिकेस कोणतीही नोटीस न देता आणि कोणत्याही ठोस आदेशाशिवाय केलेला ‘फेरफार’ रद्द करून ‘त्या’ दोन्ही मिळकतींना पूर्ववत पालिकेचे नाव लावावे, यासाठी पालिकेने भूमिअभिलेख अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे.धर्मशाळा इमारत दुरूस्त करून गडहिंग्लज पालिकेने अनेक वर्षांपासून लिलावाने भाड्याने दिली असून त्याठिकाणी सध्या हॉटेल आहे. तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत हॉल बांधण्यास ट्रस्टला १८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी धर्मशाळा इमारत ताब्यात देण्याची मागणी ‘ट्रस्ट’ने पालिकेकडे केली आहे. यासंदर्भात पालिकेचे पदाधिकारी व प्रशासन कोणती भूमिका घेणार? याकडे शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण प्रसारासाठी आयुष्य वेचलेल्या दिनकरमास्तरांच्या नावे पालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या शाळेला स्वत:ची इमारत नसणे ही दुर्देवी बाब आहे. पूर्वीच्या ठिकाणीच शाळेची इमारत त्वरीत बांधावी. प्रांतकचेरीच्या जागेसह मारूती मंदिर व लक्ष्मी मंदिरानजीकची जागादेखील परत मिळविण्याबरोबरच शहरातील सार्वजनिक जागांची मालकी नगरपालिकेने अबाधित राखावी. - राजेंद्र गड्यान्नावर, सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्र.वादामुळे शाळा झाली ‘बेघर’अनेक वर्षांपासून महालक्ष्मी मंदिर आवारात पालिकेची दिनकरराव शिंदे विद्यालय ही शाळा होती. काही वर्षापूर्वी पालिकेने शाळेचे बांधकाम काढल्यानंतर देवस्थान ट्रस्टने घेतलेल्या हरकतीमुळे बांधकाम रखडले. त्यामुळे ‘बेघर’ झालेली ही शाळा महादेव मंदिरात व सुपर मार्केटमध्ये भरते.आता देवाचीही ‘वहिवाट’५० वर्षापूर्वी गडहिंग्लजमध्ये प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी महसूल खात्याने भाड्याने घेतलेली धर्मशाळा इमारत व्यापारी संकुल बांधण्यासाठी पालिकेला परत द्यायला शासन तयार नाही. दोन महिन्यापूर्वीच त्या जागेस वहिवाटदार म्हणून प्रांतकार्यालयाचे नाव लावण्यात आले आहे. प्रांतकचेरीची जागा परत मिळविण्यासाठी संघर्ष सुरू असतानाच श्री.मारूती मंदिरालगतच्या धर्मशाळा इमारतीचाही वाद निर्माण झाला आहे.
‘पालिके’च्या जागेला ‘देवस्थान’नेही लावले नाव !
By admin | Updated: February 26, 2015 00:14 IST