लोकायुक्तांनी मागितला ‘देवस्थान’चा अहवाल
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत लोकआयुक्तांनी विधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे अहवाल मागविला आहे. यासंदर्भातील तक्रार भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शहर अध्यक्ष सुरेश पोवार यांनी लोकायुक्तांकडे केली होती.देवस्थान व्यवस्थापन समितीमधील गैरव्यवहारांच्या विरोधात सुरेश पोवार यांनी विधि व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यात त्यांनी सन समितीचे २०१४-१५ लेखापरीक्षण व फक्त सावंतवाडी विभागीय कार्यालयाचे २०१३-१४ लेखापरीक्षणात दिसलेला अपहारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश व्हावेत, देवस्थानचे झालेले आर्थिक नुकसान देवस्थान समिती सदस्य व सचिव यांच्याकडून वसूल करावी, देवस्थान व्यवस्थापन समिती बरखास्त करून प्रशासक नेमून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. या तक्राराबाबत प्रधान सचिवांनी कोणतीच कार्यवाही न केल्याने सुरेश पोवार यांनी राज्याच्या लोकायुक्त आणि उपलोकायुक्तांच्याकडे तक्रार केली. त्यावर लोकायुक्तांनी विधि व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांकडे देवस्थानच्या कारभाराच्या माहितीचा अहवाल मागविला असल्याचे कक्ष अधिकारी सो. सु. जांबेकर यांनी कळविले आहे.