सडोली (खालसा) : तिढा न सुटताच डी. वाय. पाटील साखर कारखान्याने करवीर तालुक्यातील देवाळे, गाडेगोंडवाडी, सावरवाडी परिसरात ऊस तोडण्या सुरूकेल्या होत्या. या ऊस तोडण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडून हळदी (ता. करवीर) येथील कारखान्याच्या गट आॅफिसला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना, ऊस तोडप्यांना हाकलून लावले. ‘एफआरपी’चा तिढा न सुटल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलेला नाही व शासनाने परवानगीही दिली नाही; तरी सुद्धा डी. वाय. पाटील साखर कारखान्याने करवीर तालुक्यातील देवाळे, गाडेगोंडवाडी, सावरवाडी परिसरात ऊसतोड सुरू केली होती. तोडण्या सुरू आहेत, हे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील यांनी ऊस फडात जाऊन ऊस तोडप्यांना पळवून लावून ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली व हळदी (ता. करवीर) येथील डी. वाय. पाटील कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे लावून कर्मचाऱ्यांना हाकलून लावले. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेती आॅफिसला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. यावेळी जनार्दन पाटील म्हणाले, शासनाने ऊस गाळपाची परवानगी न देता जे कारखाने सुरू केले आहेत, त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा शेतकरी संघटना आपली ताकद दाखवून देईल. यावेळी प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, तानाजी मगदूम, विलास पाटील, नामदेव कारंडे, आण्णाप्पा चौगले, बाबूराव पाटील, संदीप पाटील, सागर पाटील, रणजित पाटील यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
देवाळे, गाडेगोंडवाडीत ऊसतोडी रोखल्या
By admin | Updated: November 2, 2016 00:59 IST