कोल्हापूर : शहरातील रुग्णसंख्या सरकारी निकषाप्रमाणे तिस-या श्रेणीमध्ये आहे. सुमारे अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे व्यापा-यांचे कंबरडे मोडले आहे. आता ही स्थिती सहन करणे शक्य नाही. त्यामुळे उद्या, सोमवारपासून राजारामपुरी व महाद्वार रोडमधील व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ललित गांधी, शामराव जोशी यांनी दिली.
राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. इंद्रप्रस्थ हॉलमध्ये बैठक झाली.
कोरोनामुळे वर्षभर व्यापारी अडचणीत आहे. सलग दुस-या वर्षीचा लॉकडाऊन हा जीवघेणा ठरत असल्याची प्रतिक्रिया बहुसंख्य व्यापा-यांनी व्यक्त केली. विविध व्यापा-यांनी लॉकडाऊनच्या काळात नियमांचे कारण दाखवून महापालिकेचे काही अधिकारी अरेरावी करत असल्याचे सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली. दुकाने त्वरित सुरू करण्याचा आग्रह धरला.
व्यापा-यांचा लॉकडाऊनच्या काळातील घरफाळा माफ करावा, लाईट बिल माफ करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. बैठकीतील चर्चेत प्रताप पवार, अनिल पिंजाणी, गजानन पवार, स्नेहल मगदूम, राजकुमार चूग, दीपक पुरोहीत, रमेश कारवेकर, महेश जेवरानी, डॉ. गुरूदत्त म्हाडगुत, मधुकर डोईफोडे यांनी सहभाग घेतला. शामराव जोशी यांनी महाद्वार रोड परिसरातील व्यापा-यांच्या अडचणी मांडल्या.
गांधी म्हणाले, सरकार, स्थानिक प्रशासन, पालकमंत्री, ग्रामविकासमंत्र्यांना व्यापा-यांची भूमिका कळवू. सोमवारपासून किमान ९ ते ४ या वेळेत दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. शासनाने या मागणीवर निर्णय न घेतल्यास सोमवारपासून राजारामपुरी व महाद्वार रोड असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील व्यापारी, तसेच रेडीमेड गारमेंट डिलर्सचे व्यापारी, शिवाजी स्टेडियम परिसरातील व्यापारी कोरोनासंबंधीचे निकष पाळून आपापले व्यापार सुरू करतील. प्रशासनाने व्यापा-यांच्या अडचणी समजून घेऊन सहकार्य करावे. प्रशासनाने काही कारणांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास त्यास सर्व व्यापारी सामूहिकपणे प्रतिकार करतील. कारवाईला सामोरे जातील.
बैठकीस राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे सचिव रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, रेडीमेड गारमेंट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम निसार यांच्यासह विविध व्यापारी उपस्थित होते.