शिरोळ : जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याचा निर्धार शिरोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. विकास संस्था गटातून श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांचे नाव एकमताने संमत करण्यात आले. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरोधात तालुक्यातील सर्व विरोधकांनी मोट बांधली आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सोमवारी पुन्हा कोंडीग्रे येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. संस्था गटातून काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांचे नाव निश्चित करून सत्ताधारी गटातून त्यांना उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेण्याचा निर्णय झाला. एकूणच जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकारण तापले आहे.