जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वारणा या नद्या दूषित बनल्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी, मोठ्या प्रमाणात साथीचे आजार फैलावू लागले आहेत. सध्या गॅस्ट्रो, कावीळ, जुलाब यासह अन्य आजाराने जनता त्रस्त झाली आहे. तालुक्यातील सर्वच नदीपात्रात दूषित पाणी दाखल झाले आहे. हेच दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. पिण्यास अयोग्य पाणी असल्याचा अहवाल पाणी तपासणी पथकाने प्रशासनास दिला आहे. मात्र, दूषित पाण्यावर प्रशासनाने उपाययोजना केल्या नसल्यामुळे अनेक गावांत साथीच्या आजाराने तोंड वर काढले आहे.सध्या मोठ्या प्रमाणात तालुक्यातील प्रत्येक गावात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहेत. दूषित पाण्यामुळे अनेकांना पोटदुखी, जुलाब याची लागण झाली आहे, तर काही गावांत काविळीचे रुग्ण आढळून येत आहेत.दूषित पाण्याच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. औषध उपचारासह पाणी गरम करून पिण्याचा सल्ला सर्व डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी रुग्णांना देत आहेत. (प्रतिनिधी)आरोग्य विभागाचा सल्लासर्व शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे. औषध उपचारासह पाणी दूषित असल्याने पाणी गरम करून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देऊ लागले आहेत. प्रशासनानेही दूषित पाण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे. ठोस उपाययोजनेची गरजदरवर्षी आॅक्टोबरनंतर दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तालुक्याची दूषित पाण्यापासून सुटका व्हावी, यासाठी शासनपातळीवर अनेकवेळा आंदोलने करून लक्ष वेधण्यात आले आहे. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकावर केवळ जुजबी कारवाई करण्यापलीकडे आतापर्यंत काही झालेले नाही. यामुळे ठोस कारवाईची गरज आहे. प्रदूषित नियंत्रण मंडळावरच कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.
दूषित पाण्याचा विळखा
By admin | Updated: November 21, 2014 00:36 IST