कोल्हापूर : सुभाषनगरजवळील सप्तभवन म्हाडा कॉलनी येथील वीरश्री विनोद माने (वय ३०) या विवाहित महिलेचा आज, सोमवारी दुपारी डेंग्यूने मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी असलेल्या वीरश्रीला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते; परंतु तिची प्रकृती खालावत गेल्याने तिचे प्राण वाचविता आले नाहीत. सुभाषनगरात सिरत मोहल्लाशेजारी सप्तभवन म्हाडा कॉलनीत वीरश्री आपल्या कुटुंबीयांसमवेत राहात होती. चार-पाच दिवसांपूर्वी तिला अचानक ताप आला. तातडीने तिच्यावर औषधोपचार सुरू झाले; परंतु प्रकृती अधिकच खालावत गेली. तिच्या रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तिचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आज दुपारी बारा वाजता वीरश्रीचा मृत्यू झाला. वीरश्रीच्या मागे पती, दोन मुले असा परिवार आहे. वीरश्रीचा मृत्यू हा डेंग्यूनेच झाल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, डेंग्यूची लागण झाल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली. माने कुटुंबीय राहात असलेल्या संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. डास प्रतिबंधक धुराची फवारणी करण्यात आली. परिसरातील प्रत्येक घरात जाऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तापाचे कोणी रुग्ण आहेत का, याचे सर्वेक्षण केले. याबाबत मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, अद्याप खासगी रुग्णालयाकडून तिच्या मृत्यूची माहिती कळविण्यात आलेली नाही. संबंधित रुग्णाचे सर्व रिपोर्टही अद्याप पाहायला मिळालेले नाहीत. तथापि, खबरदारी म्हणून परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डेंग्यूने विवाहितेचा मृत्यू
By admin | Updated: November 25, 2014 00:29 IST