कोल्हापूर : शेतकऱ्यांची सर्वप्रकारची कर्जे माफ करावीत, लॉकडाऊन उठवावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे देण्यात आले.
लॉकडाऊनमुळे शेतमालाचा उठाव होत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांची सर्वप्रकारची कर्जे माफ करावीत, मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्जवसुली थांबवावी, वीजबिल माफ करावे, कोरोना उपचारासाठी आकारण्यात आलेली वाढीव बिलांची चौकशी करावी, या मागण्यांसाठी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक सुरू असतानाच बाहेर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून लक्ष वेधले. सरकार विरोधातही घोषणा देण्यात आली. पोलिसांचा विरोध झुगारून त्यांनी आंदोलन केले.
आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे, अशोक जाधव, बाबासाहेब गोसावी, ज्ञानदेव पाटील, डॉ. प्रगती चव्हाण, अनिता निकम, अमृता सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.