कोल्हापूर : विनाअनुदानित पदवी तुकड्यांच्या फी वाढीविरोधात आॅल इंडिया युथ फेडरेशनच्यावतीने शिवाजी विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर आज, सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेच्यावतीने आपल्या काही प्रलंबित मागण्यांचे निवेदन ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. अर्जुन राजगे यांना दिले. यावेळी राजगे यांनी, प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदनात म्हटले आहे की, फी निर्धारित करणाऱ्या अधिकारी मंडळांची त्वरित बैठक बोलवावी. विनाअनुदान तत्त्व रद्द करून सर्व विद्यार्थ्यांची फी शासनाने भरावी. शिवाजी विद्यापीठातील ‘एमकेसीएल’ कंपनीतर्फे लावण्यात येणाऱ्या निकालाबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे त्यांचे काम प्रशासनाने बंद करून पर्यायी व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते. मात्र, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा दिली जात नाही. प्रथम वर्ष पदवीच्या प्रवेशप्रक्रियेतील घोळ पाहता शहरातील महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी फेडरेशनच्यावतीने देण्यात आला. यावेळी वर्ल्ड फेडरेशन आॅफ डेमोक्रॅटिक युथचे उपाध्यक्ष गिरीष फोंडे, प्रशांत आंबी, मंगेश कांबळे, शुभम कोठावळे, विनायक पोतदार, अविनाश पाटील, अमिता इंगळे, विजय सुतार, वैष्णवी सावंत, देवयानी पाटील, दिलदार मुजावर, आरती पाटील, संग्राम पाटील, निरंजन पोवार, कृष्णा पानसे, नीलांबरी माने, प्रज्ञा कळंत्रे, प्रियांका शिपुगडे, पल्लवी पाटील, आरती रेडेकर, प्रियांका पोवार, रूपाली घाडगे, आदी उपस्थित होते.
फी दरवाढीविरोधात निदर्शने
By admin | Updated: July 29, 2014 23:07 IST