लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील पर्यटन केंद्र मानल्या जाणाऱ्या शिल्पग्राम हॉटेलमध्ये अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्यावेळी धिंगाणा घालून तोडफोड केल्याने खळबळ उडाली आहे.
हॉटेल शिल्पग्राममध्ये शनिवारी रात्री पार्टी होती. ती संपल्यानंतर काहींनी आईस्क्रिमची मागणी हॉटेलच्या मॅनेजरकडे केली. मात्र, त्यांंनी आईस्क्रिम नसल्याचे सांगितले. त्यावरून पार्टीसाठी आलेल्या अज्ञात युवकांनी मॅनेजरशी हुज्जत घातली. काहींनी सरळ सुरक्षा रक्षकाच्या केबिनच्या काचा फोडून तसेच कुंडी फेकून मारून परिसरात धिंगाणा घालून सामानाची नासधूस केली. या प्रकारानंतर हॉटेल कर्मचारी चांगलेच घाबरले. मात्र, त्यांनी कोणतीही तक्रार दिली नाही. नासधूस केलेले सामान हे अस्ताव्यस्त पडले होते.
हा प्रकार रविवारी सकाळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना समजताच त्यांनी शिल्पग्रामला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, अशोक पवार, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, नगरसेवक बाबू कुडतरकर उपस्थित होते. नगराध्यक्ष संजू परब यांनी, नगरपालिकेची मालमत्ता असली तरी, ती खासगी विकासकाला ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ या तत्त्वावर दिल्याचे सांगत, त्यांनी तक्रार द्यावी, असे सांगितले.
चौकट
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
शिल्पग्राममध्ये शनिवारी रात्री घडलेला सर्व प्रकार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अज्ञातांनी केलेली शिवीगाळ, हॉटेलमध्ये केलेली मोडतोड हे सर्व सीसीटीव्हीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे पोलिसांंनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही साळगावकर यांनी केली आहे.
१००१२०२१-आयएमपी-०१
सावंतवाडी येथील शिल्पग्राम हॉटेलची अज्ञातांनी तोडफोड केली आहे.