कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्याच्या गृहविभागाने कोणत्या शासकीय अधिकाऱ्याच्या गाडीवर कोणत्या रंगाचा दिवा वापरावा, याबाबत निर्देश दिले आहे. जिल्ह्णात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे अनेक अधिकारी, अंबर दिव्याला परवानगी नाही, तरीही लाल दिव्याची गाडी वापरत आहेत. याबाबतचे ३५ पुरावे राज्य निवडणूक आयोगास पत्राद्वारे कळविले आहेत. प्रशासनाने कारवाई न केल्यास न्यायालयाच्या अवमान प्रकरणी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. सर्वाेच्च न्यायालयाने १५ आॅक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या आदेशाने गृहविभागाने ४ एप्रिल २०१४ रोजी काढलेल्या परिपत्रकात कोणत्या अधिकाऱ्याने कोणत्या रंगाचा दिवा गाडीवर वापरावा, याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये लाल, अंबर व निळा दिवा गाडीवर लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. लाल, अंबर व निळा दिवा वापरून गैरवापर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. गृहविभागाच्या सूचनेची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागातर्फे उघडावी, अशी मागणी ‘प्रजासत्ताक’चे सचिव बुरहान नायकवडी यांनी केली. (प्रतिनिधी)
लाल दिव्याचा होतोय गैरवापर ‘प्रजासत्ताक’ची कारवाईची मागणी :
By admin | Updated: September 27, 2014 00:52 IST