संजय पाटील - सरुड -दिस उगवला की डोक्यावर रताळांचं ओझं किंवा करवंद, जांभळांची पाटी घेऊन घरातून बाहेर पडावं... वाटा-आडवाटा तुडवीत एखाद्या हमरस्त्याला यावं... मिळेल त्या वाहनानं एखादं गाव गाठावं, डोक्यावर ओझं घेऊन गाव धुंडून काढावा... रताळी किंवा करवंद, जांभळं विकून मिळेल ते धान्य किंवा पैसे घेऊन पुन्हा आपला गाव जवळ करून मिळेल त्याच्यावर आपला संसार चालवावा.. यासाठी फिरताहेत धनगर समाजाच्या पायाची चाके.शाहूवाडी तालुक्यातील डोंगरकपारी, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या धनगर बांधवांच्या जीवनाची ही कहाणी. जीवनाच्या वाटेवर पुढारलेल्या समाजापासून कित्येक मैल मागे राहिलेल्या व उपेक्षित जीवन जगणाऱ्या या बांधवांच्या जगण्यासाठी करावा लागणाऱ्या संघर्षाला सलाम करावा वाटतो. सध्या सरुड परिसरातील अनेक गावांत रताळे विकून उदरनिर्वाह करणारे धनगर बांधव दिसत आहेत. सुगीच्या दिवसांत शाहूवाडी तालुक्यातील डोंगर कपारीतील धनगरवाड्यातील धनगर बांधवांची पायपीट दिसत आहे.करवंद, जांभळे तसेच रताळे ही धनगर बांधवांना वर्षाचे धान्य मिळवून देतात. जंगलातील एखाद्या पडीक जमिनीवर किंवा मोठ्या शेतकऱ्याची जमीन ‘खंडानं’ घेऊन त्यात रताळी पीक घेतात. काढणीयोग्य झाल्यास ते जमिनीतून काढून पोत्यात भरून डोक्यावरून तीन-चार मैल चालत प्रमुख रस्त्यावर आणून, तेथून मिळेल त्या वाहनाने एखाद्या मोठ्या गावात घेऊन जावे लागते. गावातून पायी चालत आरोळ्या ठोकून ही रताळे धान्याच्या बदल्यात द्यावी लागतात. यावर्षी पावसामुळे रताळे उशिरा काढल्यामुळे आपण आता आलो असल्याचे त्यांनी सांगितले. दसरा-दिवाळीत हा हंगाम असतो. हा रताळांचा हंगाम संपला की अन्य कोणता तरी व्यवसाय शोधायचा. एप्रिल, मे मध्ये करवंद, जांभळांच्या सुगीचा आधार घेऊन त्यातून मिळणाऱ्या धान्य व पैशांतून कसाबसा संसार चालवायचा, असा आमचा व्यवसायच असल्याचे त्यांनी सांगितले.
पोटासाठी धनगर समाजाची वणवण
By admin | Updated: January 15, 2015 23:20 IST