गडहिंग्लज : राधानगरी, भुदरगडमध्ये पक्षप्रवेश झाला, करवीरमध्येही होईल; परंतु स्थापनेपासून आम्ही नेतृत्वाला प्रामाणिकपणे ताकद दिली आहे. हक्काचे मागतोय आमच्यावर अन्याय करू नका. मला कुठलेही पद नको, माझ्या कार्यकर्त्यांना न्याय द्या, अशी साद माजी आमदार राजेश पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना घातली.महागाव येथे आयोजित चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कागल पाठोपाठ पक्ष सभासद नोंदणीसह पदवीधर मतदार नोंदणीतून उपमुख्यमंत्री अजित पवारांना ताकद देण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.पाटील म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठीच शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र शिनोळीत सुरू केले आहे. त्यामुळे ते सरोळीला स्थलांतरित करणे चुकीचे असल्याने त्याला आपला ठाम विरोध आहे.जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, शिवाजी विद्यापीठ, जिल्हा बँकेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सेवा केल्यामुळे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यास नक्कीच यश मिळेल. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, एकेकाळी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ३ मंत्री, २ खासदार, ५ आमदार होते. त्यामुळे गतवैभवासाठी संघटनेची बांधणी मजबूत करा. याप्रसंगी कार्याध्यक्ष अनिल साळोखे, उपाध्यक्ष जयसिंग चव्हाण, शिवानंद हुंबरवाडी, नितीन दिंडे यांचीही भाषणे झाली. अनिल फडके यांनी स्वागत केले. आनंदराव नांदवडेकर यांनी आभार मानले.
पराभवाची प्रांजळ कबुली१६०० कोटींची कामे केली; परंतु कल्याणकारी योजना, केलेली कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडल्यामुळेच पराभव झाल्याची प्रांजळ कबुली देतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धारही राजेश पाटील यांनी व्यक्त केला.
‘दिलगिरी’तूनही ‘दमबाजी’!आमदार शिवाजीराव पाटील यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात विरोधकांवर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे मतदारांवर पश्चात्तापाची वेळ आली आहे. दिलगिरी व्यक्त करतानाही त्यांनी आपला इतिहास व प्रवृत्तीप्रमाणेच विरोधकांना समज दिल्यामुळे त्याला ‘दिलगिरी’ म्हणायची की ‘दम’ असा सवालही राजेश पाटील यांनी केला.
‘चंदगड’मधील हत्ती न्या..!लोकभावनेचा आदर करून अंबानींनी नांदणीतील हत्ती परत द्यावा आणि शेतकऱ्यांना त्रास देणारे चंदगड-आजऱ्यातील जंगली हत्ती, गवे, रानडुकरे खुशाल घेऊन जावे, असा टोला पाटील यांनी लगावला.