इचलकरंजी : मान्सून लांबल्याचे सावट येथील गणेशोत्सवाच्या सणावर पडल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी हालत्या देखाव्यांचे असणारे प्रमाण कमी झाले असून, गणपतीच्या उंच मूर्ती स्थापित करण्यावर मंडळांचा अधिक भर आहे. वाढलेली महागाई आणि पावसाच्या लांबलेल्या हंगामामुळे हालत्या देखाव्यांची संख्या ४० टक्क्यांनी घटली आहे.शहरातील कलानगर परिसरात विविध पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक प्रसंगांवर आधारित हालते देखावे करणारे कारागीर आहेत. गेल्या ३० वर्षांपासून शामराव कुंभार, गोरखनाथ कुंभार, मच्छिंद्र कुंभार असे कलाकार पूर्वी कागद व प्लास्टरपासून हालत्या मूर्ती तयार करीत असत. सध्या कागदाऐवजी ग्लास फायबर वापरला जातो. येथील हालत्या देखाव्यांना कोल्हापूर, सांगली, बेळगावबरोबरच सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, हुबळी, अशा जिल्ह्यांतील छोट्या-मोठ्या शहरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मागणी असते.यंदा जून संपूर्ण महिना आणि जुलै महिन्यातील पहिला आठवडा कोरडा गेला. दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कलानगरमधील हालत्या देखाव्यांच्या मूर्तींना गणेश मंडळांकडून मागणी आली नाही. त्यानंतर पाऊस पडला असला तरी हालत्या मूर्ती तयार करणे व त्यांचे हालतेपण दाखविण्यासाठी करावे लागणारे यांत्रिक काम यासाठी वेळ द्यावा लागतो. तितका वेळ नसल्यामुळे अनेक गणेश मंडळांनी उंच मूर्र्ती स्थापित करण्याकडे आपला कल दाखविला. साधारणत: दहा फुटांपासून एकवीस फुटांपर्यंत उंच मूर्ती तयार करण्याची मागणी नोंदविण्यात आली असल्याची माहिती गोरखनाथ कुंभार यांनी दिली.हालत्या देखाव्यांचे प्रमाण कमी असले तरी ‘जय मल्हार’, ‘संत तुकाराम’ अशा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधील प्रसंगांवर आधारित हालते देखावे बुकिंग करण्यात आले आहेत. त्याचबरोबर श्रीकृष्णाचे विराट रूप दर्शन, भक्त प्रल्हाद अशा देखाव्यांनाही मागणी आहे. (प्रतिनिधी)
हालत्या देखाव्यांच्या संख्येत घट
By admin | Updated: August 5, 2014 00:17 IST