कागल : येथील पोस्ट कार्यालयासमोरील टपालपेटीमध्ये एकाच दिवशी सहाशे-सातशे पोस्टल मते टाकण्याच्या घटनेबद्दल आज, शनिवारी निवडणूक विभागाकडून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. मात्र, उद्या, रविवारी मतमोजणी सुरू करण्यापूर्वी राज्य निवडणूक निरीक्षकांकडून या विषयीचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती कागल विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मोनिका सिंग यांनी दिली. दरम्यान, येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आज संजय घाटगे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. याची माहिती हसन मुश्रीफ समर्थकांना मिळाल्यानंतर ते देखील पंचायत समितीसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, तर दोन्ही बाजंूच्या आजी-माजी सैनिक संघटनांच्या नावाने प्रांताधिकाऱ्यांना या घटनेबद्दल निवेदने देण्यात आली. दरम्यान, माजी आमदार संजय घाटगेंनी या प्रकरणाची सी. बी. आय. चौकशी करावी व या ५९० पोस्टल मतांबद्दल संबंधित सैनिकांचे जबाब घ्यावेत, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.काल, शुक्रवारी कागल पोस्टाच्या टपालपेटीत एकाच दिवशी सैनिकांची पोस्टल मते मोठ्या संख्येने टाकण्यात आल्याबद्दल शिवसेना उमेदवार संजय घाटगे समर्थकांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. याबद्दल हसन मुश्रीफ समर्थकांवर दोषारोप केला होता. तर हा प्रकार संजय घाटगेंच्या समर्थकांनीच केला आहे, असा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केला होता. दोन्ही बाजूंनी चौकशी झाल्याशिवाय ही मते मोजू नयेत, अशी मागणी झाली. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग यांनी जिल्हा पोस्ट कार्यालय, पोलीस प्रशासन यांच्याकडे या घटनेचा अहवाल मागितला होता. आज तो अहवाल प्राप्त झाला. त्या अहवालानुसार मोनिका सिंग यांनी आपला अहवाल तयार करून राज्य निवडणूक निरीक्षकांकडे सुपूर्द केला आहे. हे निवडणूक निरीक्षक उद्या मतमोजणी सुरू होण्यापूर्वी या घटनेबद्दल आपला निर्णय जाहीर करतील. त्यानंतर मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. दरम्यान, सैनिकांची ५९० मते ही त्यांची फसवणूक करून तसेच शासकीय यंत्रणेच्या त्रुटीचा गैरफायदा घेऊन कागल पोस्ट आॅफिससमोरच्या पोस्ट पेटीत आलेली आहेत. ही मते मोजणीस घेऊ नयेत, अशी मागणी कागल विधानसभा मतदारसंघातील माजी सैनिकांनी आज, शनिवारी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनावर काशीनाथ जिरगे, आनंदा इंगवले, श्रीकांत रेडेकर, यांच्यासह अनेक माजी सैनिकांच्या सह्या आहेत.
कागलमधील पोस्टल मतांचा निर्णय मतमोजणीपूर्वी देणार
By admin | Updated: October 19, 2014 00:45 IST