भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यात अपुऱ्या मानधनावर आणि सुविधांशिवाय काम करणाऱ्या सुमारे सोळाशे कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. ऐन दिवाळीचा सण घेतलेल्या हातउसन्यावर काढावा लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मानधन मिळले नसल्याने क्षयरोगासारख्या सामाजिक व्याधी निवारणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामावरही परिणाम झाला. राज्य तसेच केंद्र सरकारच्या पातळीवर निधी मंजुरीबाबतचा उदासीनपणा पाहता, आणखी किती प्रतीक्षा करायची, असा प्रश्न कर्मचाऱ्यांतून होत आहे. राज्यातील जिल्ह्यांत सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांत एकूण सोळाशे कर्मचारी काम करीत आहेत. क्षयरोगासंबंधी जनजागृती, रुग्णांची माहिती संकलन, उपचार करणे, आदी कामे या कर्मचाऱ्यांकरवी करून त्यांचा राज्यपातळीवरील डाटा केला जातो. २००० सालापासून हे काम सुरू आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल किंवा आॅक्टोबरमध्ये निधी येतो, पण यंदा मात्र तो चार महिने मिळालेला नाही. मुळात मानधन कमी, त्यात कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यात काही सुधारणा होणे अपेक्षित असताना, सरकारनेही दखल घेतली नाही.
सोळाशे जणांच्या मानधनास ‘क्षय’
By admin | Updated: November 9, 2014 01:07 IST