कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भाटणवाडी येथील गीता सागर पाटील (वय ३२) यांचा बुधवारी सकाळी मेंदूतील रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेऊन आल्यानंतर तासाभराने ही घटना घडल्याने सीपीआरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले, तसेच त्यांचा व्हिसेराही राखून ठेवला आहे.
गावामध्ये ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून लसीकरण आयोजित करण्यात आले होते. तेथून गीता पाटील या लस घेऊन आल्या. त्या घरी एकट्याच होत्या. पाठीमागील बाजूस त्या चक्कर येऊन पडल्या. थोड्या वेळाने त्यांना पडलेले त्यांच्या मामांनी पाहिले आणि त्यांना उठविले. त्या शुद्धीत होत्या. साखरपाणी दिले गेले; परंतु नंतर त्यांना परत चक्कर आली आणि त्या जागीच मृत्यू पावल्या. संध्याकाळी सीपीआरमध्ये शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांचे स्वीय सहायक सागर पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, दीर भावजय असा परिवार आहे. त्यांना आठ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी असल्याने त्यांच्या अशा अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.