कोल्हापूर : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे कोमल सुभाष पाटील (वय २२, रा. काळम्मावाडी, ता. राधानगरी) या बाळंतिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी गोंधळ घालत पाचगाव रस्त्यावरील ‘महालक्ष्मी नर्सिंग होम’ या रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्याने जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोमल पाटील हिला सोमवारी प्रसववेदना सुरू झाल्याने नातेवाइकांनी सरवडे येथील श्री हरी रुग्णालयामध्ये दाखल केले. इथे तिच्यावर शस्त्रक्रिया केली असता तिला मुलगी झाली. तिची प्रकृती खालावल्याने आज पहाटे पाचगाव रस्त्यावरील ‘महालक्ष्मी नर्सिंग होम’ रुग्णालयात तिला उपचारार्थ दाखल केले. रुग्णाची गंभीर अवस्था पाहून डॉ. तानाजी पाटील यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने सकाळी आठला तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाइकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांनी गोंधळ घालत डॉक्टरांच्या केबिनवर हल्ला केला. रुग्णालयातील खुर्च्या, स्ट्रेचर, झाडांच्या कुंड्यांची तोडफोड केली. अचानक झालेल्या गोंधळामुळे इतर रुग्ण व त्यांचे नातेवाईक बिथरले तर रुग्णालयातील कर्मचारी पळून गेले. दरम्यान, जुनार ाजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर मोहिते सहकाऱ्यांसमवेत रुग्णालयात आले. त्यांनी नातेवाइकांची समजूत काढून शांत केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठविला. दरम्यान, नातेवाइकांनी सरवडे येथील रुग्णालयाचीही तोडफोड केली. गुन्हा दाखल करायचा की नाही, याबाबत नातेवाईक, डॉक्टर व पोलीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. अखेर नातेवाइकांनी डॉक्टरांच्या विरोधात तक्रार नसल्याचे लेखी लिहून दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सूर्यवंशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जन्मताच आईविना पोरकी कोमल पाटील यांनी गोंडस मुलीला जन्म दिला आणि काही वेळातच त्या जग सोडून गेल्या. रुग्णालयात त्यांच्या मृत्यूने नातेवाईक आक्रोश करीत होते, तर काही संतप्त होऊन गोंधळ घालत होते. यावेळी जन्मताच आईविना पोरकी झालेल्या बालिकेकडे पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे काळम्मावाडीच्या बाळंतिणीचा मृत्यू
By admin | Updated: January 14, 2015 01:27 IST