मुरगूड : तौउते चक्रीवादळाचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातही जाणवला. गेले दोन दिवस मुरगूड परिसरात जोरदार वारा आणि पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी मुरगूड कुरणी व मुदाळ विभागातील अधिकारी, कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. काही वेळा बराच वेळ वीज गायब होती; पण महावितरणने जनजागृतीसह केलेल्या नियोजनामुळे कुठेही मोठी दुर्घटना घडली नाही.
चक्रीवादळाच्या अगोदरच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमच नागरिकांना आवाहन करणारा संदेश महावितरणने पाठवून अधिकाऱ्यांचे फोन नंबरही प्रसिद्ध केले होते. शनिवार, रविवार या दोन दिवशी मुरगूड परिसरात जोरदार वारा सुटला होता. याच बरोबर पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे दोन्ही दिवस वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता; पण अगदी रात्री दहा वाजता गेलेली वीज ही महावितरणाच्या तयारीमुळे दहा मिनिटांत आली; पण ज्या ठिकाणी मोठे नुकसान झाले. तिथे काही मात्र वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागला.
मुरगूड परिसरात दोन अधिकाऱ्यांसह दहा कर्मचारी तैनात केले होते. परिसरातील अनेक ठिकाणी किमान दहा झाडे विद्युत वाहिनीवर पडलेली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तसेच महावितरणाचे नुकसानही झाले आहे. यामध्ये कुरणी फिडरवरून आलेल्या वाहिनीवर मोठे झाड पडले होते. तर मुरगूड चिमगाव रस्त्यावर दोन ठिकाणी विद्युत वाहिनीवर झाडे पडली होती. आदमापूर निढोरीदरम्यान असणाऱ्या ओढ्यानजीक झाड कोसळले होते. तर सोमवारी गणेश मंदिराजवळ मोठा बिघाड झाल्याने शहरातील वीजपुरवठा दुपारनंतर बंद होता. या ठिकाणी विविध गट करून कर्मचारी पाठवून ती झाडे दूर करून वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांनी केला.
वरिष्ठ अधिकारी भिकाजी भोळे, सहा अभियंता प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भिकाजी चौगले, शहाजी खतकर, वसंत केंडे, सचिन वांद्रे, सतीश कोळी, वैभव लोंढे, युवराज मांगोरे, प्रसाद मोरबाळे यांनी काम केले.
फोटो ओळ :- मुरगूड परिसरातील विद्युत वाहिनीवर पडलेली मोठ-मोठी झाडे अशी कर्मचाऱ्यांनी दूर केली.