कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना अखेर न्यूट्रीयन्टस अॅग्रो फ्रूटसच्या ताब्यात देण्यात आला. ‘न्यूट्रीयन्टस’ने करारानुसार १६.७९ कोटी रुपये जिल्हा बँकेकडे जमा केल्याने बँकेने शुक्रवारी रीतसर कारखान्याचा ताबा कंपनीला दिला. त्यामुळे ‘दौलत’ चालू होण्याची आशा अधिक गडद झाली आहे. जिल्हा बँकेची ‘दौलत’ कारखान्यांची व्याजासह ६७ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी बँकेने अनेकवेळा भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासह विक्रीच्या दहावेळा निविदा प्रसिद्ध केल्या होत्या; पण ‘दौलत’चा तिढा बँकेला सुटला नव्हता. भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत अकराव्या वेळी निविदा प्रसिद्ध केल्यानंतर न्यूट्रीयन्टस अॅग्रो फ्रुटस् प्रा. लि. गोकाक यांनी निविदा दाखल केली. ‘न्यूट्रीयन्टस’ने ४५ वर्षे दीर्घमुदतीने कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन कारखान्याच्या येणे रकमेपैकी ५० टक्के कर्ज मार्च २०१७ पर्यंत बँकेला देण्याबाबत तयारी दर्शविली. कारखान्याचा ताबा घेताना २५ टक्के म्हणजेच १६.७९ कोटी बँकेला देण्याबाबत बँक व कंपनी यांच्यामध्ये लेटर आॅफ इन्टेंट झाला. त्यानुसार शुक्रवारी ‘न्यूट्रीयन्टस’चे सीए अजिंक्य जगोजे यांनी १६.७९ कोटींचा धनादेश बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सुपूर्द केला. बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी विकास जगताप यांनी कारखान्याचा तत्काळ ताबा दिला. उर्वरित २५ टक्के रक्कम मार्च २०१७ पर्यंत देण्याची तयारी कंपनीने दाखविली आहे. ही रक्कम मुदतीत भरणा न केल्यास करार रद्द करून त्याच क्षणी कारखान्याचा ताबा परत घेण्याबाबत करारात अट घातली आहे. यावेळी बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक निवेदिता माने, भैया माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, विलास गाताडे, सर्जेराव पाटील, संतोष पाटील, आर. के. पोवार, अनिल पाटील, आदी उपस्थित होते.(छायाचित्र / पान ७)
‘दौलत’ ‘न्यूट्रीयन्टस’कडे
By admin | Updated: July 2, 2016 00:57 IST