चंदगड : चंदगड तालुक्याला भेडसावणारे दोन ज्वलंत प्रश्न म्हणजे गेलीे तीन वर्षे बंद असलेला दौलत कारखाना व एव्हीएच प्रकल्प. मतदारांनी आपल्याला दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी यापुढील काळात दौलत कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रदूषणकारी एव्हीएच प्रकल्प बंद करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिलीे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर यांच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर अध्यक्षस्थानी होते.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष एम. जे. पाटील यांनी स्वागत केले. माजी सरपंच अरुण पिळणकर यांनी प्रास्ताविक केले. खासदार महाडिक पुढे म्हणाले, चंदगड तालुक्याचा मागासलेपणा पुसण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसुधार योजनेंतर्गत राजगोळी (खुर्द) गावाची निवड केली आहे. हे गाव विकासाचे रोल मॉडेल बनविणार असून, गावासह तालुक्याचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचविणार आहे. एव्हीएचबाबत मंत्री जावडेकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे. येत्या काही दिवसांत त्यावर तोडगा निघेल, अशी आशा आहे. बंद काळात दौलत कारखाना चालू करण्यासाठी जयंत पाटील यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना स्थानिक नेत्यांमुळे अपयश आले. यापुढील काळात दौलत, एव्हीएचसह अन्य प्रश्नांसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, या निवडणुकीत घरातीलच उमेदवार रिंगणात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. मी केलेल्या विकासकामांवर माझा विश्वास होता. लोकांनीही हाच विश्वास सार्थ ठरवत मला पुन्हा एकदा संधी दिली आहे. यापुढे पाच वर्षांत पर्यटन व काजूला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डॉ. नंदा बाभूळकर म्हणाल्या, ैैजवळच्या सर्वच माणसांनी अचानकपणे या निवडणुकीत साथ सोडल्याने आम्ही अडचणीत सापडलो होतो. बाजीप्रभूने ज्याप्रमाणे खिंड लढविली, त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनीही मावळ्यांप्रमाणे या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केल्याने आपल्याला विजय मिळाला. राजकीय अजेंडा नव्हे, तर सामाजिक बांधीलकी म्हणून एव्हीएच सुरू होऊ देणार नाही. आतापर्यंत निधीपेक्षा पुढील पाच वर्षांत यापेक्षाही जास्त निधी आणू असे आश्वासन दिले. रामराजे कुपेकर, पं. स. सदस्या अनुराधा पाटील, संजय पाटील, बी. डी. पाटील, एन. एस. पाटील, कल्लाप्पा भोगण, अशोक पाटील, बाबूराव हळदणकर यांची भाषणे झाली. भैरु खांडेकर, शिवाजी सावंत, अशोक पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गोपाळ ओऊळकर यांनी आभार मानले.
दौलत कारखाना सुरू करणार
By admin | Updated: November 8, 2014 00:24 IST