शिरोळ : सन २०१८-१९ मधील एफआरपीवरील विलंबित कालावधीच्या पंधरा टक्के व्याजाची रक्कम शेतकऱ्यांनी स्वेच्छेने संमती देऊन सोडून दिल्यामुळे शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याची पंधरा टक्के व्याजाची रक्कम वसुलीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी रद्दबातल केले आहेत. त्यामुळे व्याजापोटी वसुलीचा साखर आयुक्तांनी यापूर्वी दिलेला आदेश रद्दबातल झाला आहे.
येथील दत्त साखर कारखान्याच्यावतीने साखर आयुक्तांकडे दाखल केलेल्या अर्जावर सुनावण्या झाल्या. ७ हजार १३२ सभासदांनी पंधरा टक्के व्याजाची रक्कम स्वेच्छेने सोडून दिल्याची संमती दिल्याचे सादर करण्यात आले होते. त्यामुळे संमती दिलेल्या व संमती न दिलेल्या उर्वरित सर्व ऊस पुरवठाधारक शेतकऱ्यांना एफआरपी व त्यापेक्षा जादा रक्कम दिली गेली असल्याने व्याजापोटी दिलेले वसुलीचे आदेश साखर आयुक्त गायकवाड यांनी रद्द केले आहेत. शिवाय ही रक्कम साखर कारखान्याच्या पुढील हंगामात वसूलपात्र ठरवून समायोजित करू शकेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.