कोल्हापूर : जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीसह पंचायत समितीच्या मासिक सभेला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून हकालपट्टी करण्याचा ठराव करण्यात येईल, असा इशारा देत भूमी अभिलेख अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावा, अशा सूचना समितीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे दिल्या. सुपाऱ्या घेऊन हातकणंगलेचे तालुका कृषी अधिकारी गरजूंना डावलून श्रीमंतांसाठी योजना राबवीत असल्याचा आरोपही यावेळी हातकणंगलेचे सभापती राजेश पाटील यांनी केला. शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृह येथे जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी समितीचे सहअध्यक्ष खा. धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. एच. टी. जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बैठकीत सर्व अधिकारी उपस्थित राहणे अनिवार्य असताना हातकणंगलेचे कृषी अधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल वादळी चर्चा झाली. सभापती राजेश पाटील यांनी हे अधिकारी पंचायत समितीच्या एकाही मासिक बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगून, ते का उपस्थित राहत नाहीत? याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. यावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; परंतु खा. शेट्टी यांनी जे अधिकारी सभांना उपस्थित राहत नाहीत, त्यांच्या हकालपट्टीचा ठराव करण्यात येईल, असा इशारा दिला. त्याचबरोबर पंचायत समितीच्या मासिक सभेला भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल थेट भूमी अभिलेख अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, टंचाई आराखडा, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, राष्ट्रीय भूमी अभिलेख कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, निर्मल भारत अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, इंदिरा आवास योजना, डाक विभागाकडील योजना, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण, सांसद आदर्श ग्राम योजना, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, आदींचा आढावा घेण्यात आला. ‘मनरेगा’तून जिल्ह्यात झालेल्या कामांची ३५ लाखांची बिले अद्याप मिळालेली नाहीत. यासाठी सरकारकडे खासदारांनी पाठपुरावा करावा, अशी विनंती जिल्हाधिकारी सैनी यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेत एड्स, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारी रुग्णांनी लाभ घेण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘रोहयो’तून जिल्ह्यातील १९ गावांत २५ कामे सुरू असून, यासाठी ७७२ मजूर कार्यरत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिली. २०१५-१६ या वर्षासाठी ‘रोहयो’तून जिल्ह्यात ५०० विहिरींचे उद्दिष्ट असल्याचे सांगून यासाठी पंचायत समितींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यासाठी आमचेही सहकार्य राहील, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभेदार यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘सांसद आदर्श ग्राम’मधील गावांच्या विकासासाठी यंत्रणांनी प्रयत्नशील राहावे ‘सांसद आदर्श ग्राम’योजनेतील सोनवडे खुर्द, पेरीड आणि राजगोळी खुर्द या तीन गावांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी आपल्याकडील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच या तीन गावांमध्ये शौचालय नसलेल्या ३८६ कुटुंबांना शासन योजना, लोकसहभाग, आदी उपक्रमांतून शौचालय उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केली. तुम्ही एवढी काळजी घ्या... ‘एमएसईबी’च्या अधिकाऱ्यांच्या चालढकलपणाबद्दल बोलताना शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती पंडित नलवडे यांनी तुमचा आम्हाला उपयोग झाला नाही तरी चालेल; पण डीपीमधून बाहेर येणाऱ्या धोकादायक वायर, कुलूप नसलेल्या पेट्या यामुळे गंभीर प्रसंग उद्भवूून मनुष्य व पशुहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असा टोला लगावला. गगनबावडा तालुका हागणदारीमुक्त शासनाच्या अभियानांतर्गत गगनबावडा तालुका हागणदारीमुक्त झाला असून, डिसेंबरपर्यंत भुदरगड, राधानगरी, आजरा व पन्हाळा हे तालुकेदेखील हागणदारीमुक्त म्हणून घोषित होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी दिली.
दांडीबहाद्दरांना हाकलणार
By admin | Updated: November 22, 2015 00:32 IST