मलकापूर : कोरोना काळातील ५० टक्के घरफाळा मलकापूर नगर पालिकेने माफ करावा, या मागणीसाठी बहुजन क्रांती दल, शाहूवाडी यांच्यावतीने नगर पालिकेवर दंडस्थान मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष बनेश साठे यांनी केले.
मोर्चाची सुरुवात मलकापुरातील विठ्ठल मंदिरापासून करण्यात आली. आंदोलकांनी विठ्ठल मंदिरापासून दंडस्थान घालण्यास प्रारंभ करून सुभाष चौक मार्गे मोर्चा नगरपालिकेसमोर येताच आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मोर्चासमोर बोलताना बनेश साठे म्हणाले, कोरोना काळात सर्वसामान्यांची नोकरी गेली. छोटे-मोठे व्यवसाय बंद झाले, त्यामुळे पालिकेने सर्वसामान्य नागरिकांचा पन्नास टक्के घरफाळा माफ करावा. आपल्या मागण्यांचे निवेदन नगराध्यक्ष अमोल केसरकर यांना देण्यात आले. आंदोलनात संघटनेचे बनेश साठे, पांडुरंग मोरे, संतोष कांबळे, महेश मोरे, संतोष पाटील, रघुनाथ कांबळे, आदींसह संघटनेचे कार्येकर्ते उपस्थित होते.
फोटो
मलकापूर नगरपालिकेने शहरातील नागरिकांचा पन्नास टक्के घरफाळा माफीसाठी बहुजन क्रांती दल संघटनेच्यावतीने काढण्यात आलेला दंडस्थान मोर्चा.