कोल्हापूर : रद्द केलेले रिक्षा परवाने पुनर्जिवित करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकांनी आज, सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांचा निषेध केला. परिवहन अधिकारी अनुपस्थित राहिल्याने रिक्षाचालकांना हात हलवत माघारी परतावे लागले. दरम्यान, रिक्षाचालकांची बैठक बुधवारी (दि. २६) घेतो, असे पत्र प्रशासनाने तीन आसनी रिक्षा वाहतूक कल्याण समितीला दिले.कोल्हापूर शहरात सुमारे चार हजार, तर जिल्ह्यात १५ हजार रिक्षाचालक परवानाधारक आहेत. शहरातील व ग्रामीण भागातील रिक्षा व्यवसायामध्ये मोठा फरक आहे. वेळेत नूतनीकरण न केलेले परवाने रद्द करणे, परमिटसाठी आठवी पासची अट लावणे, कल्याणकारी मंडळ स्थापन न करणे, अशा अनेक अन्यायकारक निर्णयांमुळे कोल्हापुरातील प्रामाणिक रिक्षाचालक मेटाकुटीला आला आहे. दरम्यान, या मागणीसाठी समितीने २१ नोव्हेंबरला आरटीओ यांना पत्र दिले होते. त्यावेळी प्रशासनाने आजची वेळ दिली होती. परंतु, आज अधिकारी अनुपस्थित होते. त्यामुळे रिक्षाचालकांनी निषेध केला.
रिक्षाचालकांकडून दराडे यांचा निषेध
By admin | Updated: November 24, 2014 23:59 IST