आजरा : सर्फनाला धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय झाला नाही. ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ अशी प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना त्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ धरणग्रस्तांनी धरणाचे काम आज बंद पाडले. सकाळी दहा वाजता सुमारास धरणग्रस्त सर्फनाला धरणस्थळावर जमा झाले व घोषणा देत धरणाचे काम बंद पाडले.
धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत अविश्वासाचे वातावरण तयार होईल असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. पुनर्वसन कायद्यातील तरतुदींच्या चुकीचा अर्थ लावून धरणग्रस्तांना पुनर्वसनापासून वंचित ठेवले जात आहे. सर्व धरणग्रस्तांना लाभक्षेत्रात जमीन वाटप झाली पाहिजे. लाभक्षेत्रात धरणग्रस्तांसाठी पुरेशी जमीन संपादन झालेली नाही. ती करावी संकलन रजिस्टर दुरूस्तीबाबत प्रत्यक्ष कार्यवाही करावी, बुडित क्षेत्रातील गावठाण, घरे, मोजणी करण्याची विनाकारण घाई सुरू आहे.
धरणग्रस्तांना विश्वासात न घेता बळजबरीने पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत विचारणा केलेनंतरही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत अधिकारी गांभीर्याने निर्णय घेत नाहीत. आज धरणस्थळावर सुरेश मिटके यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांनी धरणाचे काम बंद पाडले. आधी पुनर्वसन मगच धरण, पुनर्वसनाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, धरणग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देणेत आल्या. काम बंद पाडण्यासाठी पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
--------------------------
* फोटो ओळी : सर्फनाला धरणाचे ‘काम बंद’ पाडण्यासाठी धरणस्थळावर निघालेले धरणग्रस्त.
क्रमांक : ०५०४२०२१-गड-०१