श्रीकांत ऱ्हायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : धामोडपासून गगनबावड्याला जवळचा रस्ता म्हणून धामोड - कुरणेवाडी - खामकरवाडी - म्हासुर्ली या मार्गाची प्रवासी निवड करतात. पण या रहदारीच्या मार्गावर कुरणेवाडी व खामकरवाडीच्या दरम्यान असणारा बंधारा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने गेल्या चार दिवसात दोन मोठे अपघात झाले आहेत . या बंधाऱ्यावर संरक्षक कठडे करण्याची मागणी खामकरवाडी - कुरणेवाडी ग्रामस्थांकडून होत असून ते तात्काळ न बसवल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
तत्कालीन आमदार गोविंदरावजी कलिकते यांच्या स्वनिधीतून १९९५ च्या दरम्यान या पुलाची निर्मिती झाली व या बंधाऱ्यामुळे धामणी खोऱ्यासह गगनबावडा तालुका राधानगरी तालुक्याला जोडला गेला. गगनबावड्याला राधानगरीस जोडणारा हा बंधारा दळणवळणाचे एक उत्तम उदाहरण त्यावेळी ठरले होते. या बंधाऱ्यामुळे संपूर्ण धामणी खोरा आजही तुळशी खोऱ्याशी अखंडपणे जोडला गेला आहे. पण पंचवीस वर्षात एकदाही या बंधाऱ्याची डागडुजी न झाल्याने सध्या या बंधाऱ्याचे पिलर कमकुवत तर झाले आहेतच, शिवाय बंधाऱ्याचे संरक्षक कठडे पूर्णत: मोडले आहेत.
सध्या या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू असते. शाळा, कॉलेजला प्रवास करणारे या दोन्ही खोर्यातील विद्यार्थी याच मार्गावरून भोगावती, कोल्हापूर, राधानगरीसारख्या ठिकाणी कॉलेजला ये-जा करत असतात. परिणामी वाहनांची संख्या या मार्गावरून जास्त होताना बघावयास मिळते. दोन्ही बाजूने प्रचंड उतार असल्याने या बंधाऱ्यावर दोन्ही बाजूंनी जोराच्या गतीने वाहने खाली उतरतात. त्यातच या बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने वाहनांना ओव्हरटेक करताना वाहन थेट नदीपात्रात कोसळते व अपघात होतात.
गेल्या आठवड्यात या पुलावरून दोन मोटारसायकलस्वार अलगदपणे पुलावरून नदीपात्रात कोसळले. नदीपात्रात पाणी तुंबले असल्याने त्यांना फार इजा झाली नाही. पण एखादे मोठे वाहन या बंधाऱ्यावरून खाली कोसळले, तर मोठा अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे या बंधाऱ्यावर संरक्षक कठडे बसवण्यात यावेत, अशी मागणी खामकरवाडी व कुरणेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो ओळी=
खामकरवाडी-कुरणेवाडी दरम्यानचा संरक्षक कठड्याअभावी उभा असलेला हा बंधारा.