महावितरणच्या या कृतीमुळे आता या ठिकाणी सध्या पहावयास मिळत असलेली दुर्दशा व तयार झालेले विदारक व वातावरण पाहून प्रत्येकाचे मन हेलावून गेल्याशिवाय राहात नाही. शासन म्हणतेय ऑक्सिजन निर्मितीसाठी झाडे लावा, झाडे जगवा अन शासनाच्या अधिपत्याखाली असणारे महावितरण मात्र सरळ सरळ झाडांची निर्दयीपणे कत्तल करीत सुटले आहे. परिणामी नागरिकांतून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या दूरदृष्टीमुळे कारखाना परिसरात मोठ्य़ा प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.सर्व प्रकारच्या वृक्ष लागवडीमुळे कारखाना परिसर हिरवाईने नटला गेला असून सर्वत्र नयन मनोहर आल्हाददायक निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. कारखाना मुख्य प्रवेशद्वारासमोरील यळगूड -हुपरी रस्त्यावरील अशोकाच्या झाडामुळे हिमाचल प्रदेश किंवा काश्मीरमधील एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला लाजवेल असे सुंदर निसर्गरम्य व डोळ्याला आल्हाददायक वाटेल असा अनुभव येत होता. सन १९९२ पासून कारखान्याने या झाडाचा सांभाळ केला होता. आताज हेच वृक्ष हुपरी व परिसरातील गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून महावितरणने येथील सुमारे १६३ झाडाची अगदी निर्दयीपणे कत्तल करून सारे सृष्टिसौंदर्य उद्ध्वस्त केले आहे
या बाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता रामेश्वर कसबे म्हणाले, हुपरी व परिसरातील गावांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहिन्यांना ही झाडे मोठ्य़ा प्रमाणात अडथळा ठरत होती. या झाडांमुळे दररोज विद्युत पुरवठा खंडित होत होता. गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या वादळामुळे अनेक वेळा धोकादायक स्थितीस सामोरे जावे लागले आहे. भविष्यात एखादा मोठा अनर्थ घडू नये यासाठी मनाविरुद्ध जाऊन ही झाडे तोडावी लागली आहेत. येथील झाडाची करण्यात आलेली तोड आमच्याही मनास वेदना देत आहे. त्यामुळे या बदल्यात आम्ही यळगूडमधील अंबाबाई नगरमध्ये २०० झाडांची लागवड करीत आहोत.
फोटो ओळी -1)हुपरी -यळगूड रस्त्यावर जवाहर साखर कारखाना स्थळी अगदी काल (सोमवार)सायंकाळ पर्यंत दिसत असलेले निसर्गरम्य व मनाला आल्हाददायक वाटणारे चित्र ...
2) महावितरणच्या अवकपेमुळे आज सकाळपासून त्याच ठिकाणी अगदी भकास अन् वेदनादायी दुर्दशा दर्शवणारे चित्र ...