कोल्हापूर : थकबाकीमुळे डबघाईला आलेल्या महावितरणच्या मदतीला अखेर ग्राहकच धावले आहेत. महावितरणने बिल भरण्याच्या कळकळीच्या आवाहनाला मान देत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ग्राहकांनी अवघ्या २० दिवसात तब्बल ३१० कोटी २० लाख रुपयांचे वीज बिल भरुन महावितरणला उभारी दिली आहे. यात इचलकरंजी विभागातून ३१ कोटी ८३ लाख, कोल्हापूर शहर १९ कोटी ७९ लाख तर सांगली शहर विभागातून १६ कोटी ८५ लाखाच्या वीज बिलांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात वीज बिलांच्या थकबाकीचा डाेंगर वाढतच चालला आहे. ग्राहकांची आर्थिक ओढाताण हाेत असली तरीदेखील महावितरणची परिस्थितीही बिकटच आहे. वीज खरेदी, वितरण व रोजचा प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी मोठे दिव्य करावे लागत आहे. ग्राहकांनी ही अडचण समजून घ्यावी आणि स्वस्तात वीज देणारी आपली महावितरण कंपनी वाचवावी, असे आवाहन करण्यात आले होते, तसेच तब्बल दोन वर्षे एक रुपयादेखील वीज बिल भरलेले नाही, त्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचीही मोहीम हाती घेण्यात आली होती. शिवाय हप्ते पाडून देण्याचीही सोय उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांनी थोडी का असेना पण बिल भरण्यास सुरुवात झाली आहे.
चौकट ०१
कोल्हापूर व सांगलीत आता ३१० कोटी रुपये वसूल झाले आहेत, तर अजूनही ४८८ कोटींची बिले थकलेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) ५४० कोटी २१ लाखाच्या थकबाकीपैकी २१५ कोटी ९४ लाख रुपये वसूल झाले आहेत. याचवेळी सांगली जिल्ह्यात २५८ कोटी २५ लाखाच्या थकबाकीपैकी ९४ कोटी २७ लाख रुपयांची वसुली झालेली आहे.