कोल्हापूर : सकाळी प्रचंड धाकधूक आणि कोरोनाच्या सावटातच मत मोजणीला सुरुवात झाली. निर्बंधामुळे आत सोडले जात नसल्याने बाहेर बसूनच ऑनलाईन निकाल जाणून घेतला जात होता. सकाळपासून सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे चिंतेचे ढग राखीव गटातील एक विजय मिळाल्यावर थोड्या आनंदात बदलले. दुपारनंतर मात्र पुन्हा घासाघीस सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांची दोलायमान परिस्थिती होती.
राखीव गटातील मतमोजणीला सकाळी सुरुवात झाल्यावर विरोधी आघाडीने पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतल्याने सत्ताधारी गोटात कमालीची शांतता पसरली, तर विरोधी आघाडीत आनंदाला भरते आले; पण कोरोनामुळे जल्लोष साजरा करता येत नसल्याने गाडीतून आणलेली गुलालाची पोती गाडीत ठेवून केवळ मुठ्ठीभर घेऊन तो उधळून जल्लोष केला जात होता. विशेषतः मिणचेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यावर ते मतदान केंद्रावर आल्यावर लगेच महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा दिल्या. गुलाल लावून पोलीस यायच्या आत सर्वजण परत फिरले.
कल कळेल तसा सत्ताधारी गटातील सदस्यांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. शौमिका महाडिक या पहिल्यापासूनच पिछाडीवर असल्याने त्यांच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर अधिकच तणाव दिसत होता. अखेर शेवटच्या फेरीत आघाडी घेऊन त्यांनी सत्ताधारी गटाचे खाते उघडल्याने सत्ताधारी यांच्या जिवात जीव आला.
दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणी जाण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे रमणमळा पोस्टापासूनच कडे करण्यात आले होते. मतमोजणीच्या ठिकाणी पास असणाऱ्यांना प्रवेश होता. इतरांना चारशे मीटरच्या बाहेरच थांबावे लागत होते, शिवाय पार्किंगची व्यवस्था पोलीस मैदानात असल्याने तेथेच समर्थक थांबून ऑनलाईन निकाल जाणून घेत होते.
बयाजी यांना अश्रू अनावर
पहिल्यांदाच निवडणूक लढवून गोकुळचा संचालक म्हणून विजयी झाल्याचे घोषित होताच बयाजी शेळके यांना अश्रू अनावर झाले. गगनबावडा येथील वेसरफ गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या ३९ वर्षीय बयाजी शेळके यांनी पहिल्याच प्रयत्नात गोकुळमध्ये यश मिळविले.
विजयी उमेदवार प्रतिक्रिया
ही तर महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या विजयाची नांदी आहे. दूध उत्पादकांचा संघ उत्पादकांच्याच मालकीचा राहावा म्हणून निवडणूक लढवली, त्यात यश आल्याचे समाधान आहे.
डॉ. सुजित मिणचेकर, विरोधी शाहू शेतकरी आघाडी
माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला, स्वाभिमानी उत्पादकांनी विश्वास दाखवला. त्याच्याच जोरावर विजय मिळवता आला. हा विजय मी माझ्यावर विश्वास टाकलेल्या मतदारांना आणि नेत्यांना बहाल करतो.
बयाजी शेळके, विरोधी शाहू शेतकरी आघाडी
फोटो : ०४०५२०२१-कोल-गोकुळ ऑनलाईन