जयसिंगपूर : शहरातील यादवनगर येथील रास्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यावेळी डेमोक्रेटिक पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हे धान्य वितरण थांबविले. उद्या, सोमवारी निकृष्ट धान्य तहसील कार्यालयात हजर करण्यात येणार आहे.शासनाने दारिद्र्यरेषेखालील व केसरी शिधापत्रिकाधारकांसाठी गहू व तांदूळ अल्पदरात देण्याचे धोरण राबविले आहे. जयसिंगपूर महाविद्यालयानजीक असणाऱ्या यादवनगर येथील रास्त भाव दुकान क्रमांक दहामध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत असल्याची माहिती ‘डीपीआय’चे सुभाष साठे यांच्यासह कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास या धान्याचे वितरण रोखले. सुमारे तीन गव्हाच्या पोत्यांमध्ये अळ्या व सडलेले धान्य आढळून आले आहे, तर तांदळाच्या पोत्यामध्येही अळ्या दिसून आल्या. जयसिंगपूरसह तालुक्यातील अन्य धान्य दुकानांत अशा प्रकारचे धान्य आले असेल तर ते दुकानदारांनी वितरित करू नये, चांगल्या पद्धतीचेच धान्य शिधापत्रिकाधारकांना द्यावे, या मागणीसाठी उद्या तहसीलदार सचिन गिरी यांची भेट घेणार असल्याची माहिती साठे यांनी यावेळी बोलताना दिली. आंदोलनात प्रकाश गोरे, गणेश साठे, प्रमोद तिवडे, उमेश मोरे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य
By admin | Updated: November 30, 2014 23:56 IST