चंदगड : चंदगड तालुक्याच्या निसर्गसौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडत असून, वीकेंड लॉकडाऊनमुळे रविवारी बेळगाव व परिसरातील युवकांनी तालुक्यातील पर्यटनस्थळी मोठी गर्दी केली होती. तुडीये प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने खबरदारी म्हणून पर्यटकांची अॅन्टिजन तपासणी करण्यात आली.
तालुक्यात हाजगोळी येथील चाळोबा, तिलारी-स्वप्नवेल, पारगड-बाबा धबधबा, सुंडीचा सवतकुळ धबधबा, किटवाडचा धबधबा यासह जंगमहट्टी धरण, कलानंदीगड, वैजनाथ मंदिर आदी परिसरात रविवारी पर्यटकांनी पोलिसांना चकवा देत रिमझिम पावसासह निसर्गाचा आनंद लुटला. यामध्ये युवक व युवतींचा भरणा अधिक होता.
पोलिसांच्या अगोदर पर्यटकांची हजेरी
शनिवारी व रविवारी सकाळी १०नंतर शिनोळी, मोटणवाडी फाटा, होसूर, चंदगड फाटा व पाटणे फाटा येथे चंदगड पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जातो. पण पर्यटकांनी ती वेळ चुकवत सकाळपासूनच हजेरी लावली होती. यामुळे बंदोबस्त असूनही त्याचा उपयोग झाला नाही.
काही दिवसांपूर्वी प्रातांधिकारी विजया पांगारकर यांच्या उपस्थितीत झांबरे धरण परिसरात आलेल्या पर्यटकांची कोरोनाची खबरदारी म्हणून अॅन्टिजन तपासणी करण्यात आली होती. त्याच धर्तीवर रविवारी हाजगोळी येथील चाळोबा याठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. त्यामधील सर्व अहवाल निगेटिव्ह आले.
चौकट :
तुम्ही बाबा मज्जा करा खरं..!
पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्यांमध्ये तळीरामांची संख्या अधिक असते. त्यामुळे पर्यटनस्थळी हुल्लडबाजी केली जाते. याचा नाहक त्रास स्थानिक लोकांना होत असून, ‘तुम्ही बाबा मज्जा करा खरं आम्हाला त्रास देऊ नका’ अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून ऐकायला मिळत आहेत.
चौकट :
पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला
तालुक्यात मध्यंतरी गायब झालेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने उर्वरित शेतीकामांना वेग आला आहे. त्यातच पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिकेही जोर धरु लागल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू आले आहे.
फोटो ओळी :
हजगोळी (ता. चंदगड) येथे रविवारी चाळोबाकडे जाणाऱ्या पर्यटकांची अॅन्टिजन तपासणी करण्यात आली.
क्रमांक : ११०७२०२१-गड-०४