लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहरात आठ दिवसांचा लॉकडाऊन शिथिल होताच नागरिकांनी खरेदीसाठी तुंबळ गर्दी केली. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीचा आनंद लुटला. अत्यावश्यक सेवेसह अन्य आस्थापना सुरू ठेवण्यात आली होती. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. मात्र, सोमवारी शहरात सर्वत्र गर्दीचा महापूर उसळल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून येत होते.
शहर व परिसरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे १६ ते २३ मे दरम्यान आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला. लॉकडाऊन काळात बंदला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परंतु सोमवारी लॉकडाऊन शिथिल होताच ७ ते ११ या वेळेत नागरिक विविध कारणासाठी बाहेर पडले होते. मात्र, अकरानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. त्यानंतर पटापट आस्थापने व बाजारपेठा बंद करण्यास धावपळ सुरू झाली. परंतु दुपारनंतर शहरातील रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती.
शहरातील यंत्रमाग व्यवसायही सुरू करण्यात आला. त्याचे साहित्य खरेदीसाठी कारखानदार बाहेर पडले. अत्यावश्यक सेवेसह अन्य आस्थापना सुरू ठेवण्यात आल्यामुळे त्या ठिकाणीही खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. तसेच पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी गर्दी केली होती. दुपारनंतर अनेक जण घरीच राहणे पसंत केल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी जाणवत होती.
चौकट
विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक
कडक लॉकडाऊन सोमवारी काही प्रमाणात शिथिल झाल्यामुळे अनेकजण विनाकारण बाहेर पडले होते. काही महाभाग मित्रांची भेट घेण्यासाठी मोटारसायकलीवरून बिनधास्त फिरत होते. वृद्ध नागरिक लहान मुलांना घेऊन बाजारात फेरफटका मारताना दिसत होते. जणू काही कोरोना गायब झाला आहे की काय, असे वातावरण शहरात निर्माण झाले होते.
फोटो ओळी
२४०५२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत लॉकडाऊन शिथिल होताच नागरिकांनी खरेदीसाठी तुंबळ गर्दी केली.
छाया-अनंतसिंग