गांधीनगर : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर वसाहत रुग्णालयात लस घेण्यासाठी गर्दी होऊ लागल्याने जागेअभावी नागरिकांना उन्हातच ताटकळत थांबावे लागत आहे. त्या अनुषंगाने गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांसठी मंडप सुविधा व खुर्च्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे उन्हात थांबणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून त्यावरील उपाय म्हणून लस घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे गांधीनगर परिसरातील गावागावामध्ये आरोग्य केंद्र तसेच इतर केंद्रे उभा करून लस देण्याची सुविधा करण्यात आली आहे. गांधीनगर वसाहत रुग्णालयात दररोज २०० च्या वर नागरिकांना ही लस दिली जात आहे. वसाहत रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालय असल्याने त्याठिकाणी इतरही रुग्णांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोविड लस घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला असून त्या ठिकाणी जागेअभावी गर्दी होत आहे. त्यामुळे वसाहत रुग्णाच्या प्रांगणात उन्हातच नागरिकांना ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे गांधीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू लालवानी व ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण यांनी उन्हात थांबणाऱ्या नागरिकांना मंडप घालून तसेच त्यांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करून दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो: २२ गांधीनगर लसीकरण
ओळ- गांधीनगर वसाहत रुग्णालयाच्या आवारात ग्रामपंचायत प्रशासनाने कोविड लस घेणाऱ्यांसाठी मंडप उभारणी व बैठक व्यवस्था करून दिली आहे. यावेळी सरपंच रितू लालवाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या पाँल उपस्थित होत्या.